तुळशीचं लग्न अन् पिठलं

बंड्या: (तव्यातल्या लजीज मिक्स व्हेजकडे बघत...) काय गं पिठलं बनवणार होतीस ना?

मॉंसाहेब: हो, पण नाही बनवलं.

बंड्या: का?

मॉंसाहेब: तुळशीचं लग्न आहे ना.

बंड्या: मग?!

मॉंसाहेब: लग्नाला कोणी पिठलं बनवतं का?

(हे काय लॉजिक? नाय झेपलं.)

बंड्या: मग लग्नतरी कोणी दरवर्षी करतं का?

पत्र

~२० वर्षांपुर्वीची


तारिख - ३०/१/१९९१




तारिख - २४/२/१९९४




आयुष्याचा लाईफबॉय होणे

बंड्या न्हाणीघरात आंघोळीला शिरला आणि दुसऱ्या सेकंदाला आतुन बोंबलला - "अरे, आंघोळीचा साबण संपलाय. दुसरा कुठाय?"
"अरे काढलाय ना नविन. तिकडेच ठेवलाय बघ." - प्रतिबोंब
"कोणता? लाईफबॉय??? हा संडासचा साबण आंघोळीला??"

मराठी भाषेसाठी शोध लागलेल्या "आयुष्याचा लाईफबॉय होणे" ह्या नविन वाक्प्रचाराची ही छोटीशी प्रस्तावना.
अर्थात - असलेल्या आपल्या दर्ज्यापेक्षा/क्षमतेपेक्षा अत्यंत कमी/किरकोळ/दुय्यम/तृय्यम भोग वाट्यास येणे.

लाईफबॉय साबणाची जाहिरात पाहिली तर, जगातिल अनेक थोर शास्त्रज्ञांनी आयुष्य खर्ची घालून बनवलेला पहिल्या क्रमांकाचा, ९९.९९% किटाणू मारणारा (बाहरकेही नही अंदरकेभी आजारोसे मुक्ती देनेवाला) साबण. पण "माझ्या" निरिक्षणानुसार ९९.९९% वेळा तो आंघोळीसाठी नं वापरता संडासहून आल्यावर हात धुण्यासाठी वापरला जातो. अर्थात त्यात काही गैर नाही. पण फॅक्टरीतुन जन्माला आलेल्यांपैकी मोजक्यांचेच आयुष्य कार्यसिद्धिस कारणी लागते. (उगीचच स्पर्म्स आठवले...) असो. श्या... छ्या... लईच लटांबर. हे असं समजावणं कठीण. ठळक नमुना म्हणून परवाच बब्याने बंड्याला ऐकवलेला एक किस्सा सांगतो.

सिमेंटची पोती पोचवायला बब्यानं एक टेंपो मागवला होता. As per IST (Indian Stretchable Time) नुसार तो वाढीव वेळेत आला तेव्हा बब्यानं लाडिक खर्जातल्या आवाजात ड्रायव्हरला झापला.
त्यावर ड्रायव्हर "I'm really sorry Sir. Due to heavy traffic I was late." असं फर्ड्या इंग्रजीत बोल्ला नि बब्या हपापला. दोन पेग पोटात गेले की सगळ्याच्या मुखी तरखडकर विसावतात. पण इकडे सीन सोबर होता.
"का हो मालक, तुमचा ड्रायव्हर कुठे? आला नाही का आज? जे तुम्हाला यावं लागलं?!" बब्यानं सावधपणेच विचारलं.
"No Sir, I'm not the owner. I'm the driver of this tempo.". बब्या भौचक्का. टेंपो ड्रायव्हर नि इंग्लिशमें बाता... बावा...
"भाऊ लईच भारी इंग्लिश बोलता तुम्ही. काय नाव काय तुमचं?" बब्या नरमला होता. (समोरचा इंग्लिशमधे बोलला की उगीच Respected वाटू लागतो. :-P)
"साहेब माझं नाव ---. MBA झालोय मी."
"MBA!!!" बब्याकी आंखे चौडी अन् भेजा गुल्ल...
"हो. पण जॉबचे फार हाल झाले. म्हणून हे करतोय."
"अरे पण एवढं चांगलं इंग्रजी बोलतोस. कॉलसेंटरमधे घेतिल की तुला."
"नाही हो. कॉलसेंटर, बीपीओमधे डिग्रीवाल्यांना नाही घेत. तरी जुगाड लावून एका बीपीओमधे रात्री काम करतो आणि दिवसा टेंपो चालवतो."
त्याला कोणतीही मदत करायला बब्या त्यावेळी स्वतः helpless होता. "हम्म्म... लढ बाप्पू..." एवढाच काय तो दिलासा देऊन त्या आयुष्याचा लाईफबॉय झालेल्याच्या टेंपोत सामान चढवून बब्या निघाला.

चुक

लहान वयात केलेले संस्कार जसे चांगले असतात, तसच चुका पण सुरुवातीला सुधरवलेल्या चांगल्या असतात. पर अचानक ये ज्ञान कायको?? बंड्याचा दोस्त बब्या तसं आडदांड नि वांड कार्टा. अन् त्याचा हा किस्सा...

तर बब्याभाईला एकदा अचानक त्याचा लहानपणीचा दोस्त भेटला. भेटला तो भेटला तेपण निवांत क्षणी. मग काय गप्पांना आला ऊत. रात्र झाली तरी हाणतायत गप्पा. कोरड पडलेल्या घशांमुळे मैफिल अर्धी राहू नये म्हणून त्यांना ओलं करण्याचा एक थोर विचार मनी आला आणि बियरच्या बाटल्या घेऊन बसले बसस्टॉपवर... बसस्टॉप... हा की राव, बसस्टॉप, सार्वजनिक ठिकाणी. चांगली बोलबच्चन चालू होती आणि आली तिकडे पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन. साहेब साला चिल की नजरवाला कौव्वा था. पोरांना बाटल्या मागं सारताना पाहिलं. झालं. बोनस मिळणार असे लड्डू सायबाच्या मनात फुटायला लागले. पोरांची झडती घेतली. अगदीच कंगाल निघाली पोरं. वाटलं पोरांना थोडा राग दिला की पोरं हात/पाय/पंख/खिसे/कपडे झटकून थोडेतरी पैसे काढतिल. कसलं काय... कफल्लक साले. सायबाची चिडचिड. घातलं गाडीत. "साहेब, चुक झाली हो... द्या सोडुन... पुन्हा नाय होणार...". बब्या नि त्याच्या दोस्ताची विनवण्यांची थुकपट्टी चालू. साहेब ऐकेना. आणि उलटं सायबानंच भारी डायलॉग टाकला...
पहिले एक चुक होते. मग चुकीचा खिळा होतो. मग खिळ्याचा खिळ होतो. मग खिळचा खुट्टा होतो. मग खुट्ट्याचं पाचर होतं. आणि ते पाचर **त घुसतं. म्हणून चुक होताच मोडली पाहिजे.
सायबानं भारी श्लेष पकडला. त्याचा खाऊ नाही मिळाला म्हणून ही पुडी सोडली. (छोट्या खिळ्याला चुक म्हणतात हे मला माहित नव्हतं.) पर ये जो ज्ञान दिया ते लई भारी दिलं राव!!! त्यासाठी सायबाला वरंगुठा.



अवांतर १ - बब्याच्या दोस्ताचा बाप पालिकेत कमिशनर निघाला. मॅटर क्लोज.
अवांतर २ - वरंगुठा = वर + अंगुठा AKA ThumbsUp

सावली

"काय?"

"काय?"

(जरा खेकसूनच) "काय काय ?"

"अरे कुठे काय ? काहीच नाही "

"काहीच नाही? हं? कधीच काही नसतं सांगायला तुझ्याकडे … हा ? मग कशाला उगाच माझा पाठलाग करत असतेस …नेहमी उगीच मागे पुढे घुटमळत राहतेस….

"नेहमी ?"

"हा चुकलंच… नेहमी कुठे? अंधार आला की तू जातेस लगेच सोडून…."

"तेव्हाही असते… पण… दिसत नाही एवढच…"

"काही पण "

"अरे तुझ्याबरोबर असणं नियतीच आहे."

"नियती? आ? कसलं काय… काही नियती-बियती नाही…. बिन कामाची तू… नुसतीच असतेच…. उलट तुझ असणं मला मी अजूनही  जमिनीवरच आहे ह्याची जाणीव करून देत राहतं… "

"मग बरं आहे न जमिनीवर असणं "

"बरं? मला आभाळात उडायचंय… उंच उंच… अगदी त्या प्रकाशासारखं…. आणि असं जमिनीवर राहून माझा प्रकाशाकडचा प्रवास सुरूपण होणार नाही … आणि सुरु झाल्यावरही तू अशी भिरभिरणार माझ्या मागे... माझी सावली… सावली -प्रकाशाचा अभाव…. अंधारच एक प्रकारचा… त्या आभाळातल्या प्रकाशाची सावली पाहिलीयेस कधी? नसतेच त्याला सावली….  नसतोच त्याला अंधाराचा एकही धागा…"

"..."

"काय झालं? गप्प का?"

"मग जाऊ सोडून?"

"जा ना… मघापासून काय सांगतोय मग… निरुपोयोगी तू… कोणी थांबवलंय तुला…." 

"उम्म…  बरं… जाते मी……"

सावलीने साथ सोडली तसा तो मोकळा झाला… लागलीच त्याने  प्रवास सुरु केला… प्रकाशाच्या दिशेने… जमिनीवरून  हळू हळू अधांतरी होत… तरंगत वर वर… उंच… अवकाशाकडे...

आणि तिथे एक वृक्ष. आत्यंतिक तेजाने झळझळणारा… बोधी वृक्ष… पाहता क्षणीच त्याची अंतरीची खुण पटली… ह्याच वृक्षाखाली बुद्धाला आंतर्ज्ञान प्राप्त झालेलं. हाच तो प्रकाश वृक्ष. माझ्या प्रवासचं ध्येय. केवढा दैदिप्यमान फुलोरा. जणू काही कोणी सूर्याला कापसाच्या बोळ्यासारखं पिळल्यावर ठिबकलेला प्रकाशाचा थेंब त्या वृक्षाने अलगद वरचेवर झेलून घेतलेला. 
आपल्या अंतिम ध्येयापर्यंत पोहचल्याची, प्रवास पूर्ण झाल्याची जाणीव त्याच्या मनात. सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण... पण...

पण त्याला थकल्यासारख वाटतंय... फारच कासावीस झालाय... आनंद साजरा करता येत नाहीये... थकवा आलाय. एवढं तेज... एवढं प्रचंड तेज सहन करायची ताकद नाहीये. चोहीकडे भरलेला हा प्रकाश डोळ्यात साठवता येत नाहीये. भोवळ येईल असं जाणवतंय. विसावायला कुठे बोटंभरपण सावली दिसत नाहीये.

सावली....... सावली....... निरर्थक तू...... निरुपयोगी तू..... निरर्थक तू.... निरुपयोगी तू.... आह!... तेच शब्द कानात घोंघावतायेत... 

आणि हा प्रकाश असह्य होत चाललेला

अं... शुद्ध हरपतेय

सभोवती रणरणतं ऊन. सळसळनाऱ्या पिंपळाच्या सावलीत विसावलेला तो. एका थंड हवेच्या झुळूकेने सर्व शीण कापसासारखा उडून गेला.    

त्याचा प्रकाशाकडचा प्रवास असा एका सावलीशी संपलेला होता... आणि नुकताच जन्मलेला बुद्ध हळूच गालातल्या गालात हसत होता...

In loop

मला ते मूळ व्हायचय ज्यांनी खोडाला मजबुत पाया दिला...
मला ते खोड व्हायचय ज्यांनी असंख्य फांद्यांना भक्कम आधार दिला...
मला ती फांदी व्हायचय ज्यांना अनेक फळं लगडली...
मला ते फळ व्हायचय ज्याने मिठास अनुभव दिला आणि बीजं उजवली...
मला ते बीज व्हायचय जिने जमिनीत रुजुन भव्य वृक्ष उभारला...
मला ती जमिन व्हायचय जिने त्या वृक्षाची मूळं पोसली...
मला ते मूळ व्हायचय...

CTRL+C ... CTRL+C ... CTRL+C ... Somebody break the loop...

आकाश

पृथ्वीवर आधांतरी. खाली पृथ्वी गोल गोल फिरत्ये. ॠतु बदलताय्त. देश बदलताय्त. माणसं बदलताय्त. ऊन आणि सावल्या. आपण आकाशाकडे ध्यान लावून. ते स्थिर आहे. तिकडे काहीच बदलत नाही. निर्विकार. ढगांचे पुंजके लावत, तर कधी दिवस-रात्रीचे रंग फासत, कितीही रुपं बदलली तरी भावांचा अभाव. कोणतही गुरुत्वाकर्षण त्याला शोषु शकत नाही.
सगळ्यांच्या नजरेच्या टप्प्यात पण कोणाच्याही कवेबाहेर. रिक्त... तल्लीन...