Showing posts with label HNY-2010. Show all posts
Showing posts with label HNY-2010. Show all posts

नविन वर्ष २०१० च्या शुभेच्छा

4 प्रतिक्रिया
हम्म्म... मला माहितीये शुभेच्छा द्यायला मी जरा उशीरच केलाय ते. नविन वर्ष २०१० चा एक आठवडा उलटूनसुद्धा गेलाय. माझ्यासाठी कोणतही वर्ष, वर्ष नसून एक मोठ्ठा दिवसच आहे. १२ महिन्यांच्या घड्याळाचा. प्रत्येक नविन वर्ष हे एका नविन दिवसासारखं असतं. डिसेंबरची रात्र सरलेली असते. त्या रात्री पाहिलेली स्वप्न साकार करण्याचा संकल्प आपण जानेवारीच्या गार पहाटे करतो. आणि ते पुर्णत्वाला आणण्याची धावपळ फेब्रुवारी-मार्चच्या सकाळी सुरु होते. मेच्या दुपारी थोडी विश्रांती मिळते. जुलै-ऑगस्टची भिजवणारी हळवी संध्याकाळ असते. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दिवेलागणीच्या वेळी गणेशोत्सव, ईद, नवरात्री साजरी करतो. नोव्हेंबरच्या रात्री आपल्या कुटुंबासोबत दिवाळीच्या फराळांचं जेवण आणि थोडं मनोरंजन करुन पुन्हा डिसेंबरच्या रात्री झोपायची तयारी... असो. तसं नविन वर्ष जेव्हा अगदी उंबरठ्यावर असतं तेव्हा आपण सगळेच नविन वर्षाचे जुने संकल्प पुन्हा नव्याने बांधायचा, सरत्या वर्षाचा आढावा घ्यायचा प्रयत्न करत असतो. मीपण तसा आढावा घ्यायचा प्रयत्न केला, जरा वेगळ्या पद्धतीने.

घड्याळात ००:००:०० चा ठोका पडला आणि ३१ डिसेंबर २००९ सुरु झाला तेव्हापासून ते ठीक ००:००:०० ०१/०१/१० चालू होईपर्यंत; त्या २४ तासात दर २ तासांनी मी फेसबुकवर माझं स्टेटस बदलत होतो. ते प्रत्येक २ तास २००९ सालाच्या एका महिन्यासाठी राखिव होते. त्या त्या महिन्यातल्या आठवणींची नोंद घ्यायचा एक साधा छोटासा प्रयत्न होता. त्याला काही प्रतिसाद मिळाले. आणि त्या आठवणींच्या नोंदी आता माझ्या साठवणीत आहेत. :)