खाडखाड... खाडखाड... खाडखाड... खाडखाड... रात्री १:३० वाजताच्या काळोखात निव्वळ लॅपटॉप स्क्रिनच्या अंधुकश्या उजेडातसुद्धा बंड्याची बोटं किबोर्डवरुन सफाईने फिरत होती. किबोर्डकडे बघायची त्याला तशी गरजच नव्हती. बंड्या, बबडी, गुंड्या, गुड्डी, पप्या, पपली सगळे आज बऱ्याच दिवसांनी एकत्र ऑनलाईन येऊन कॉन्फरन्स करुन बोलत होते. बाहेर बर्फ पडायचा थांबलेला. पण थोडा पाऊस पडून गेल्याने हवेत ओलावा आलेला आणि त्यामुळे नेहमीपेक्षा जास्तच थंडी वाटत होती. रजई घेऊन अघळपघळ अंथरुणावर पसरलेल्या बंड्याला उठून हिटर चालू करुन येणं जिवावर येत होतं. थोडं इकडे तिकडे होउन बाजुलाच बिछान्यावर पडलेलं जॅकेट चढवुन बंड्याने पुन्हा अंगाभोवती रजईचा कोष केला. आजचं जेवण नेहमीप्रमाणेच उशिरा झालेलं. सगळ्या मित्रमंडळींशी ऑनलाईन गप्पा चाल्ल्याने झोप पण येत नव्हती. कदाचित आजची रात्र नेहमीसारखिच जागुन काढायचा बंड्याचा बेत होता. कॉन्फरन्समधे गप्पांना अगदी बहर आलेला.
खुप दिवसांनी अशी मैफिल रंगली होती आणि अचानक...