तुळशीचं लग्न अन् पिठलं

बंड्या: (तव्यातल्या लजीज मिक्स व्हेजकडे बघत...) काय गं पिठलं बनवणार होतीस ना?

मॉंसाहेब: हो, पण नाही बनवलं.

बंड्या: का?

मॉंसाहेब: तुळशीचं लग्न आहे ना.

बंड्या: मग?!

मॉंसाहेब: लग्नाला कोणी पिठलं बनवतं का?

(हे काय लॉजिक? नाय झेपलं.)

बंड्या: मग लग्नतरी कोणी दरवर्षी करतं का?

पत्र

~२० वर्षांपुर्वीची


तारिख - ३०/१/१९९१




तारिख - २४/२/१९९४




आयुष्याचा लाईफबॉय होणे

बंड्या न्हाणीघरात आंघोळीला शिरला आणि दुसऱ्या सेकंदाला आतुन बोंबलला - "अरे, आंघोळीचा साबण संपलाय. दुसरा कुठाय?"
"अरे काढलाय ना नविन. तिकडेच ठेवलाय बघ." - प्रतिबोंब
"कोणता? लाईफबॉय??? हा संडासचा साबण आंघोळीला??"

मराठी भाषेसाठी शोध लागलेल्या "आयुष्याचा लाईफबॉय होणे" ह्या नविन वाक्प्रचाराची ही छोटीशी प्रस्तावना.
अर्थात - असलेल्या आपल्या दर्ज्यापेक्षा/क्षमतेपेक्षा अत्यंत कमी/किरकोळ/दुय्यम/तृय्यम भोग वाट्यास येणे.

लाईफबॉय साबणाची जाहिरात पाहिली तर, जगातिल अनेक थोर शास्त्रज्ञांनी आयुष्य खर्ची घालून बनवलेला पहिल्या क्रमांकाचा, ९९.९९% किटाणू मारणारा (बाहरकेही नही अंदरकेभी आजारोसे मुक्ती देनेवाला) साबण. पण "माझ्या" निरिक्षणानुसार ९९.९९% वेळा तो आंघोळीसाठी नं वापरता संडासहून आल्यावर हात धुण्यासाठी वापरला जातो. अर्थात त्यात काही गैर नाही. पण फॅक्टरीतुन जन्माला आलेल्यांपैकी मोजक्यांचेच आयुष्य कार्यसिद्धिस कारणी लागते. (उगीचच स्पर्म्स आठवले...) असो. श्या... छ्या... लईच लटांबर. हे असं समजावणं कठीण. ठळक नमुना म्हणून परवाच बब्याने बंड्याला ऐकवलेला एक किस्सा सांगतो.

सिमेंटची पोती पोचवायला बब्यानं एक टेंपो मागवला होता. As per IST (Indian Stretchable Time) नुसार तो वाढीव वेळेत आला तेव्हा बब्यानं लाडिक खर्जातल्या आवाजात ड्रायव्हरला झापला.
त्यावर ड्रायव्हर "I'm really sorry Sir. Due to heavy traffic I was late." असं फर्ड्या इंग्रजीत बोल्ला नि बब्या हपापला. दोन पेग पोटात गेले की सगळ्याच्या मुखी तरखडकर विसावतात. पण इकडे सीन सोबर होता.
"का हो मालक, तुमचा ड्रायव्हर कुठे? आला नाही का आज? जे तुम्हाला यावं लागलं?!" बब्यानं सावधपणेच विचारलं.
"No Sir, I'm not the owner. I'm the driver of this tempo.". बब्या भौचक्का. टेंपो ड्रायव्हर नि इंग्लिशमें बाता... बावा...
"भाऊ लईच भारी इंग्लिश बोलता तुम्ही. काय नाव काय तुमचं?" बब्या नरमला होता. (समोरचा इंग्लिशमधे बोलला की उगीच Respected वाटू लागतो. :-P)
"साहेब माझं नाव ---. MBA झालोय मी."
"MBA!!!" बब्याकी आंखे चौडी अन् भेजा गुल्ल...
"हो. पण जॉबचे फार हाल झाले. म्हणून हे करतोय."
"अरे पण एवढं चांगलं इंग्रजी बोलतोस. कॉलसेंटरमधे घेतिल की तुला."
"नाही हो. कॉलसेंटर, बीपीओमधे डिग्रीवाल्यांना नाही घेत. तरी जुगाड लावून एका बीपीओमधे रात्री काम करतो आणि दिवसा टेंपो चालवतो."
त्याला कोणतीही मदत करायला बब्या त्यावेळी स्वतः helpless होता. "हम्म्म... लढ बाप्पू..." एवढाच काय तो दिलासा देऊन त्या आयुष्याचा लाईफबॉय झालेल्याच्या टेंपोत सामान चढवून बब्या निघाला.

चुक

लहान वयात केलेले संस्कार जसे चांगले असतात, तसच चुका पण सुरुवातीला सुधरवलेल्या चांगल्या असतात. पर अचानक ये ज्ञान कायको?? बंड्याचा दोस्त बब्या तसं आडदांड नि वांड कार्टा. अन् त्याचा हा किस्सा...

तर बब्याभाईला एकदा अचानक त्याचा लहानपणीचा दोस्त भेटला. भेटला तो भेटला तेपण निवांत क्षणी. मग काय गप्पांना आला ऊत. रात्र झाली तरी हाणतायत गप्पा. कोरड पडलेल्या घशांमुळे मैफिल अर्धी राहू नये म्हणून त्यांना ओलं करण्याचा एक थोर विचार मनी आला आणि बियरच्या बाटल्या घेऊन बसले बसस्टॉपवर... बसस्टॉप... हा की राव, बसस्टॉप, सार्वजनिक ठिकाणी. चांगली बोलबच्चन चालू होती आणि आली तिकडे पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन. साहेब साला चिल की नजरवाला कौव्वा था. पोरांना बाटल्या मागं सारताना पाहिलं. झालं. बोनस मिळणार असे लड्डू सायबाच्या मनात फुटायला लागले. पोरांची झडती घेतली. अगदीच कंगाल निघाली पोरं. वाटलं पोरांना थोडा राग दिला की पोरं हात/पाय/पंख/खिसे/कपडे झटकून थोडेतरी पैसे काढतिल. कसलं काय... कफल्लक साले. सायबाची चिडचिड. घातलं गाडीत. "साहेब, चुक झाली हो... द्या सोडुन... पुन्हा नाय होणार...". बब्या नि त्याच्या दोस्ताची विनवण्यांची थुकपट्टी चालू. साहेब ऐकेना. आणि उलटं सायबानंच भारी डायलॉग टाकला...
पहिले एक चुक होते. मग चुकीचा खिळा होतो. मग खिळ्याचा खिळ होतो. मग खिळचा खुट्टा होतो. मग खुट्ट्याचं पाचर होतं. आणि ते पाचर **त घुसतं. म्हणून चुक होताच मोडली पाहिजे.
सायबानं भारी श्लेष पकडला. त्याचा खाऊ नाही मिळाला म्हणून ही पुडी सोडली. (छोट्या खिळ्याला चुक म्हणतात हे मला माहित नव्हतं.) पर ये जो ज्ञान दिया ते लई भारी दिलं राव!!! त्यासाठी सायबाला वरंगुठा.



अवांतर १ - बब्याच्या दोस्ताचा बाप पालिकेत कमिशनर निघाला. मॅटर क्लोज.
अवांतर २ - वरंगुठा = वर + अंगुठा AKA ThumbsUp

सावली

"काय?"

"काय?"

(जरा खेकसूनच) "काय काय ?"

"अरे कुठे काय ? काहीच नाही "

"काहीच नाही? हं? कधीच काही नसतं सांगायला तुझ्याकडे … हा ? मग कशाला उगाच माझा पाठलाग करत असतेस …नेहमी उगीच मागे पुढे घुटमळत राहतेस….

"नेहमी ?"

"हा चुकलंच… नेहमी कुठे? अंधार आला की तू जातेस लगेच सोडून…."

"तेव्हाही असते… पण… दिसत नाही एवढच…"

"काही पण "

"अरे तुझ्याबरोबर असणं नियतीच आहे."

"नियती? आ? कसलं काय… काही नियती-बियती नाही…. बिन कामाची तू… नुसतीच असतेच…. उलट तुझ असणं मला मी अजूनही  जमिनीवरच आहे ह्याची जाणीव करून देत राहतं… "

"मग बरं आहे न जमिनीवर असणं "

"बरं? मला आभाळात उडायचंय… उंच उंच… अगदी त्या प्रकाशासारखं…. आणि असं जमिनीवर राहून माझा प्रकाशाकडचा प्रवास सुरूपण होणार नाही … आणि सुरु झाल्यावरही तू अशी भिरभिरणार माझ्या मागे... माझी सावली… सावली -प्रकाशाचा अभाव…. अंधारच एक प्रकारचा… त्या आभाळातल्या प्रकाशाची सावली पाहिलीयेस कधी? नसतेच त्याला सावली….  नसतोच त्याला अंधाराचा एकही धागा…"

"..."

"काय झालं? गप्प का?"

"मग जाऊ सोडून?"

"जा ना… मघापासून काय सांगतोय मग… निरुपोयोगी तू… कोणी थांबवलंय तुला…." 

"उम्म…  बरं… जाते मी……"

सावलीने साथ सोडली तसा तो मोकळा झाला… लागलीच त्याने  प्रवास सुरु केला… प्रकाशाच्या दिशेने… जमिनीवरून  हळू हळू अधांतरी होत… तरंगत वर वर… उंच… अवकाशाकडे...

आणि तिथे एक वृक्ष. आत्यंतिक तेजाने झळझळणारा… बोधी वृक्ष… पाहता क्षणीच त्याची अंतरीची खुण पटली… ह्याच वृक्षाखाली बुद्धाला आंतर्ज्ञान प्राप्त झालेलं. हाच तो प्रकाश वृक्ष. माझ्या प्रवासचं ध्येय. केवढा दैदिप्यमान फुलोरा. जणू काही कोणी सूर्याला कापसाच्या बोळ्यासारखं पिळल्यावर ठिबकलेला प्रकाशाचा थेंब त्या वृक्षाने अलगद वरचेवर झेलून घेतलेला. 
आपल्या अंतिम ध्येयापर्यंत पोहचल्याची, प्रवास पूर्ण झाल्याची जाणीव त्याच्या मनात. सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण... पण...

पण त्याला थकल्यासारख वाटतंय... फारच कासावीस झालाय... आनंद साजरा करता येत नाहीये... थकवा आलाय. एवढं तेज... एवढं प्रचंड तेज सहन करायची ताकद नाहीये. चोहीकडे भरलेला हा प्रकाश डोळ्यात साठवता येत नाहीये. भोवळ येईल असं जाणवतंय. विसावायला कुठे बोटंभरपण सावली दिसत नाहीये.

सावली....... सावली....... निरर्थक तू...... निरुपयोगी तू..... निरर्थक तू.... निरुपयोगी तू.... आह!... तेच शब्द कानात घोंघावतायेत... 

आणि हा प्रकाश असह्य होत चाललेला

अं... शुद्ध हरपतेय

सभोवती रणरणतं ऊन. सळसळनाऱ्या पिंपळाच्या सावलीत विसावलेला तो. एका थंड हवेच्या झुळूकेने सर्व शीण कापसासारखा उडून गेला.    

त्याचा प्रकाशाकडचा प्रवास असा एका सावलीशी संपलेला होता... आणि नुकताच जन्मलेला बुद्ध हळूच गालातल्या गालात हसत होता...

In loop

मला ते मूळ व्हायचय ज्यांनी खोडाला मजबुत पाया दिला...
मला ते खोड व्हायचय ज्यांनी असंख्य फांद्यांना भक्कम आधार दिला...
मला ती फांदी व्हायचय ज्यांना अनेक फळं लगडली...
मला ते फळ व्हायचय ज्याने मिठास अनुभव दिला आणि बीजं उजवली...
मला ते बीज व्हायचय जिने जमिनीत रुजुन भव्य वृक्ष उभारला...
मला ती जमिन व्हायचय जिने त्या वृक्षाची मूळं पोसली...
मला ते मूळ व्हायचय...

CTRL+C ... CTRL+C ... CTRL+C ... Somebody break the loop...

आकाश

पृथ्वीवर आधांतरी. खाली पृथ्वी गोल गोल फिरत्ये. ॠतु बदलताय्त. देश बदलताय्त. माणसं बदलताय्त. ऊन आणि सावल्या. आपण आकाशाकडे ध्यान लावून. ते स्थिर आहे. तिकडे काहीच बदलत नाही. निर्विकार. ढगांचे पुंजके लावत, तर कधी दिवस-रात्रीचे रंग फासत, कितीही रुपं बदलली तरी भावांचा अभाव. कोणतही गुरुत्वाकर्षण त्याला शोषु शकत नाही.
सगळ्यांच्या नजरेच्या टप्प्यात पण कोणाच्याही कवेबाहेर. रिक्त... तल्लीन...

वाळू

ज्यांनी जितका धरायचा प्रयत्न केला तितकी त्यांच्या हातातून सुटत गेलेली
समुद्रालासुद्धा कवेत घेता आलं नाही
असंख्य खंडित लाटांनी तो अजूनही पकडायला बघतो
हाती गवसता नाही आलं तरी साथ नाही सोडली
किनारा बनून मर्यादा आखली
हवेने दिलेले आकार घेतले
अनेक हातांनीदेखिल साकारले
तात्पुरतेच, एकही टिकला नाही
कोणाला पोसलं नाही की पोटी बीजेचा गर्भ रुजवला नाही
तहान कधी लागलीच नाही आणि घटाघटा पिऊन कधी भागलीपण नाही
आर्द्रतेचा एकही दव नाही, निव्वळ कोरडेपणा
वाळूला कदाचित मोक्ष मिळालाय...

कश्ती

एक कश्ती समंदरपे तैरेनेवली,
जहा लेहेरे भेजती वहापे जानेवाली,
कश्तीमें सवारी,
उनके जानोका मोल अनमोल है कश्ती के लिए,
उनके लिये समंदरसे झगडा नाही मोड़ लिया,
उतनी हिम्मत ताकद थी, नहीं थी ये अलग बात थी,
फ़िक्र उन जानो की ज्यादा थी
किनारे लगाना था,
और मुकाबला समुंदर से थोड़ी था,
उन जानो को संभालके मंजिलतक लाना था,
किनारा मिले न मिले... समंदर निगल नहीं पाया ये बड़ी बात थी,
लेकिन कश्ती किनारे ले जाने के काबिल नहीं ये सवारियोकी तकरार थी,
अरे किसको पता था कश्ती एक साथ दो तुफ़ानोसे झगड़ रही थी...

राजेश खन्ना


आयच्या गावात!!! १७/३ नंतर डायरेक्ट ४ महिन्यांनी पोस्ट पडत्ये. आणि ती पण राजेश खन्नाच्या नावाने. भेंडी गवार ललिता पवार...  राजेश खन्ना off झाल्याची न्यूज ऐकुन मझ्या थोबाडावर पण :O ची स्मायली प्रकटली. संबंध काय??? राजेश खन्ना माझ्या generationचा हिरो नाही. मी त्याच्या खुप काही मुव्ही पाहिल्या नाहीत. आनंद पाहिलाय, बावर्ची पाहिलाय... आणि.... जोर देऊन आठवावं लागेल... लेऽऽऽ... पण तरीसुद्धा आठवत नाही. म्हणजे २ मुव्ही सोडल्या तर मी तुला ओळखत नाही.???!!! त्याची स्टाईल.... मला अज्जिबात आवडत नाही. तो "अरे ओ पुस्पा" डायलॉग तर डोक्यात जातो. Honestly दिसायला धर्मेंद्रसारखा रुबाबदारपण नाही. Okkay... तरी राजेश खन्नाचं जाणं माझ्यासाठी एक मोठी न्यूज होती. का??? कदाचित त्याच्या Stardomचं जे मोठं वजन इतरांमुळे तयार झालय ते असावं.

(Dood... chill... come to the point...)

ह्हा... तर न्यूज चॅनलच्या चक्क्यांना दळण्यासाठी किमान दोन दिवस पुरेल एवढं "सकस" धान्यं मिळालय. मुव्ही चॅनलवाल्यांना ये हफ्ता राजेश खन्ना के नाम म्हणुन त्याच्या काही मुव्हीज लूपमधे टाकून आठवड्याभराची सुटी घेता येईल. म्युझिक चॅनलवरपण त्याचीच गाणी (नविन मुव्हीचे म्युझिक प्रोमोज बोंबल्ले). फेसबुक/ट्विटरवर तर राजेश खन्ना नावाची त्सुनामी आली. कित्येकांच्या पोस्टमधेच काय तर प्रोफाईल पिक्चरमधेपण तो घुसला.

(तुजे आवशीचो घोव... तुजा प्रोब्लेम काय असा? Why u complain???)

Nonsense m not complanin. Okay... तर मुद्दा असाय की राजेश खन्नाबद्दल किंवा त्याच्या पहिला बॉलिवुड सुपरस्टार असण्याबद्दल काहिही attachment नसतानासुद्धा एक गोष्ट अशी झाली की ज्याबद्दल मी त्याला प्रचंड मान देतो. गुरु झाला तो माझा.

न्यूज चॅनलवर २४ तास राजेश खन्नाच्या निधनाची बातमी... मला कशाचं काही सोयर-सुतक नाही (हलकट आहे मी)... आणि अचानक एका न्यूज चॅनलवर "आनंद"मधला तो सीन दाखवला.. तो जेव्हा मरतो... अमिताभ बच्चन "मुझसे बात करो" म्हणुन ओरडुन त्याच्या छाताडावर कोसळतो... आणि मागुन एक आवाज येतो... बाबुमोशाय... GOD LIKE scene!!! काय नाहीये त्या सीनमधे? एक माणुस आपल्या आयुष्यातुन कायमचं निघुन गेल्याचं सत्य... ते मान्य करण्याची आपली हतबलता... तरी तो परत येईल ह्या आशेने केलेला आक्रोश... आणि एक क्षण का होईना पण तो परत आला आहे असा आनंद देणारा फसवा भास... कलेजा खल्लास... खून के आसू रोता दिल.

Shoot man!!! साला खराखुरा हाडामांसाचा माणुस मेल्याचं काही वाटत नाही. पण त्याच्या मरणाचा अभिनय तोडफोड करुन जातो! Larger than life. ये होता है काम. जीव लाऊन कि जीव टाकुन केलेलं काम. खर्रा सोना!!!

राजेश खन्नाजी... (जी??? च्यायला आत्तापर्यंत चड्डी-buddy सारखा एकेरी उल्लेख आणि आता जी!!!... हा जी...) You taught me one thing, that moment - how your work should be. I shall try my best and wish I could do it someday. One should always be remembered for his/her work, just like you.

काकाजी... RIP... prayers.. wishes.. and RESPECT to you...


आपला,
(नम्र आणि प्रेरित) सौरभ


ती


कशी गोरीप्पान काया असलेली ती

मादकतेने  ठासून  भरलेली

हलकेच जवळ घ्यावी

नाजूक देहाची

ओठांचा स्पर्श

आणि मग एक ठिणगी पेटते

झप्पकन ज्वाला उठते

ती पेट घेते

एक दीर्घ  श्वास

नशाऽऽऽऽऽ

गरम शरीर

थंड मेंदू

भरलेली फुफ्फुस

रिकामे विचार

श्वास बाहेर पडतो

तिने पेट घेतलेला असतो

जळत असते ती

उंगलीयोपे नचाता उसको मै

ती नाचते

मला बघायला आवडतं

राक्षसी काहीच वाटत नाही

तिला पण माझी किळस येत नाही

मला आवडते ती... जळताना ...

तिचा पूर्ण देह जळेस्तोवर तिला उपभोगतो मी

ती मला शांत करत असते

तिने घड्याळाचे काटे थांबवलेले असतात

मी अनंतात विलीन झालेलो असतो

तिच्यामुळे मी फक्त मी असतो

जग शून्य झालेल असतं

बोटांना तिच्या पूर्ण होणाऱ्या अस्तित्वाची धग जाणवते

तिने मला आकंठ सुख दिलेलं असतं

ती अगदी निर्मोही

पूर्ण गुंगवून स्वतःला वेगळं ठेवलेलं

सुरेश भटांच्या ओळी तिला चपखल बसतात

रंगूनी रंगात साऱ्या... रंग माझा वेगळा

ती देहात उतरून पण नसतेच

मी तिला विझवतो

वाईट नाही वाटत

तिच्या जाण्याचं दुःख नसतं

तिने घातलेली भूल मी अजून अनुभवतोय

विझताना पण ती तिच्यातली धग दाखवत होती

एक धुराची रेषा  हवेत सरळ गेली... नाहीशी झाली

मी पुन्हा माणसात आलोय...

तिने मला माणूस म्हणून जाणवून घेता येणारे सगळे अनुभव दिले

पण तिच्याशी संगत केलेली पाहून अनेक माणसांनी मला परक केलं...


लीनाशी गप्पा मारता-मारता अचानक तंद्री लागली आणि हलकेच समाधित घुसलो... समाधिवस्थेत पाजळलेलं तत्वज्ञान आज मेलबॉक्समधे टंकून आलेलं. बहुत मजा आया... Thanks Leena...

आपला,
(धुंद) सौरभ

नान-सेन्स - १

1 प्रतिक्रिया


(When things ain't just नान-सेन्स... they are Absolute नान-सेन्स :D)

(नान-सेन्सिबली) Yours,
Saurabh

दिवाळी...

1 प्रतिक्रिया
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी... दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी... Happy Diwali... Happy Diwali...

गुंड्याः अय, बंड्या... काय रे?! कोणत्या दुनियेत राहतोस??

बंड्याः का रे??

गुंड्याः दिवाळी संपली आणि आता शुभेच्छा देतोय्स?!!

बंड्याः अरे हा.. जाऊदे रे. कालच माचाफुकोने दिवाळीचे फोटो एडिट करुन दिले. म्हणुन म्हटलं चला टाकूया ब्लॉगवर. तसंपण बरेच दिवस ब्लॉग सन्नाट्यात होता.

गुंड्याः सन्नाट्यात होता!!!??? आणि आता तु काहीतरी पोस्टुन त्याला सन्नाट्यातुन बाहेर काढतोय्स.

बंड्याः हाऽऽऽ :-)

गुंड्याः बरय. चालू दे.. माझ्यातर्फेपण सगळ्यांना Happy वाली D-वाली.

याऽऽऽय... दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी... दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी...




आपला,
(शुभेच्छुक) सौरभ


Recalling - Her Lacuna

1 प्रतिक्रिया
"कोल्हाट्याचं पोर" वाचून मेघचा Her Lacuna ब्लॉगपोस्ट आठवला... आणि त्यावर केलेली एक कविता...

गावतल्या एका बदनाम गल्लीत, नार उभी करुनी नखरा हो,
वाट पहातसे कोणाची, देहाचा मांडुनि पसारा हो...

भडक तिचे हे रूप असे, जरी ना सुंदर ना मादक हो,
तरी लक्ष घेती वेधुनि, पुरुष पाहती विस्फारुन हो...

लज्जा इच्छा स्वप्न अपेक्षा, मृत झाल्या सर्व संवेदना हो,
जाणिवा करुनि बधीर ती, तृप्त करितसे वासना हो...

शरीरपिपासु जनावरांची, नजर शोधतसे सदा शिकार हो,
नसती का जर ती, तर काय उडाला असता हाहाकार हो...

बलात्कारापासून वाचवतसे, सुसंस्कृत घरचि ललना हो,
विकुनी सत्व तिने स्वत:चे, अब्रु दुसरिची रक्षिली हो...

लाथाडून समाजातून जगाने, तिजवर जरी टाकला बहिष्कार हो,
ओसाड पडतील गावे, परि कधी रिक्त न तिचा बाजार हो...

शमवूनी भोग अनेक जिवांचे, वैरागी ती राहीली हो,
धिक्कारणाऱ्या समाजानेच तिला, शैय्यासोबत केली हो...

भंगलेल्या ह्या अस्तित्वाची तमा कधी ना कुणा हो,
अश्वत्थाम्याच्या जखमेपरि, कधी ना भरेल HER LACUNA हो...

आपला,
(चांगल्या घरचं पोर) सौरभ

पाऊस

0 प्रतिक्रिया

(जुने ठेवणीतले काही...)
ग्रीष्माच्या काहिलीने अवघी सृष्टी होरपळली,
फुंकत प्राण त्यांमधे शितल हवा हळूच झुळकली,
वाहती इकडे तिकडे वारे गार कोणाचे बरे दूत बनून,
काळे मेघ पडघम बडवित नभी अचानक आले दाटून,
दवंडी पिटलि अस्मनि ह्या वीज जेव्हा ती कडाडली,
अगणित सरींची सेना निमिषार्धात ह्या धरतीवर अवतरली,
रिपरिप, रिमझिम, धो-धो करीत पाऊस असा हा बरसला,
कोंदटलेल्या श्वासा-श्वासात मृदगंध सुवासिक दरवळला...

आपला,
(भिजलेला) सौरभ

एका रुपयाची गोष्ट

2 प्रतिक्रिया
गुंड्याः बंड्या तु चहा घेणार का?

बंड्याः चालल..

गुंड्याः अण्णा दोन कटींग दे...
...
...

काय रे?? कसला विचार करतोय्स??

बंड्या: विश्वा करतो चिंताची...

गुंड्या: क्काय???

बंड्या: अरे काय नायरे... चिंता करतो विश्वाची असं म्हणायचं होतं.. सोड ना...

गुंड्या: सकाळी सकाळी मनाचे श्लोक ऐकलेस की ऐकवलेत कोणी?? बोल की...

बंड्या: तसं नाय रे.. उगीच... एक गोष्ट आठवली... कुठंतरी वाचली होती.

गुंड्या: कसली?

बंड्या: एक रुपयाची...

गुंड्या: एक रुपयाची!!! मलापण सांग ना... हां पण एक मिनिट... शॉर्टमधे सांग. चहाच्या दोन घोटात संपव. उगीच डोक्याची तंदूर नको करुस..

बंड्या: च्यायला... हलकट साल्या.. बरं ऐक. एक ना खुप श्रीमंत माणूस असतो. त्याला एक मुलगा असतो. वाया गेलेला, आळशी, कामचुकार. पैश्याची काही किंमत नसते त्याला. मित्रांमधे उडव, मजा मार, कुठे ना कुठेतरी उधळपट्टी चालूच असते. सेविंगचा कन्सेप्टच माहित नसतो त्याला. त्यामुळे त्याचा बाप एकदम टेन्शनमधे असतो. कसं होणार ह्याचं, कधी कळणार पैश्याचं महत्व ह्याला... ते त्याला समजावून समजावून थकले पण बेटा काय सुधरेना.. मग त्याला एक नामी युक्ती सुचते. तो त्याच्या पोराला म्हणतो बेटा... मी आता तुला फक्त तुझ्या गरजेसाठी आवश्यक असतिल तेवढेच पैसे देणार. बाकी तुझ्या खर्चाचे तु स्वतः कमवायचेस. आणि हो... उद्यापासून तु रोज संध्याकाळी जेवणापुर्वी एक काम करायचस. जे काही पैसे तुझ्याकडे असतिल, त्यातला एक रुपया तु माझ्या समोर आपल्या परसातल्या विहीरीत टाकायचास. ज्या दिवशी टाकायला चुकशील त्या दिवशी जेवण नाही मिळणार. बेटा म्हणतो, धत्तिच्या, एकच रुपया टाकायचाय ना. हरकत नाय. उपाशी रहायची वेळ येणारच नाही. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासुन बेटाजीचा उपक्रम चालू झाला. जो काही खर्चाला मिळत असलेल्या थोड्याफार पैश्यातला एक रुपया बाजूला काढायचा आणि जेवणापुर्वी वडिलांच्या उपस्थितीत विहीरीत टाकायला लागला. आगोदरचे काही दिवस असं केल्यावर नंतर त्याला असा एक एक रुपया बाजूला काढून ठेवायचा कंटाळा यायला लागला आणि त्याने ते थांबवलं. हा दिवसभर बाहेर हुंदडायचा आणि संध्याकाळी परत यायचा तेव्हा खिसा रिकामा. पण रुपया टाकल्याशिवाय बाप जेवायला देणार नाही हे माहित असल्याने मग आईकडून एक रुपया मागून घ्यायचा आणि विहीरीत टाकायचा. काही दिवस त्याची आईपण त्याला काही बोलली नाही. पण रोजचंच झाल्यावर तिने त्याला रुपया देणं थांबवलं. ह्याला त्याचं काही वाटलं नाही. पठ्ठ्या मित्रांकडून रोज एक रुपया घेऊ लागला. मित्र सुरुवातीला हसून रुपया द्यायचे. पण नंतर नंतर तेपण वैतागले. एकतर त्याला मिळणारे पैसे कमी, त्यामुळे त्याच्याकडुन होणार खर्च कमी, वर रोज एक रुपया द्या.. मित्र त्याले टाळू लागले. अन् एके दिव्शी त्यो दिस आलाच.. त्याकडं विहीरीत टाकायला रुपडाच न्हव्हता. झालं... बापानं म्हटल्याप्रमानं ठेवलं त्याले उपाशी. पोरगंबी झोपलं गुमान उपाशीपोटी. दुसऱ्या दिव्शीबी त्येच. तिसऱ्या दिवशी पोरगं आलं रडकुंडीला. पर बाप काय भीक घालंना. पोरगं पडलं तणतणत घराबाहेर. फुकटात कोनी रुपया देईना तेव्हा मजुरी करुन एक रुपाया कमावला आणि संध्याकाळी आणला बापासमोर. गेले दोगं विहीरीपाशी. बाप बोल्ला टाक ते नाणं विहीरीत... पोरानं ते नाणं मुठीत अजुनच आवळलं आणि वरडला... न्हाय टाकनार... मेहनत करुन कमावलाय मी त्यो. असाच कसा टाकू. तसा बाप बोल्ला. बेट्टाजी आज तुला मेहनतीनं कमावलेला एक रुपया सोडवेना आणि माझे मेहनतीचे पैसे रोज उधळायचास तेव्हा काय वाटलं नाय. रोज जे नाण टाकायचास तेबी तुझ्या मेहनतीचं न्हवतं म्हणुन टाकायला कायबी वाटत नव्हतं. पन आजचा तुझ्या हाततला रुपया तुज्या सच्च्या मेहनतीचा हाये. नको टाकूस. ठेव तुज्याकडं. तुला पैश्याचं महत्व कळावं म्हणुनच मी हे समदं केलं. पोरगं शाणं होतं. काय ते कळून चुकलं. बापाची माफी मागितली आणि पैसा व्यवस्थित सांभाळू लागला.

गुंड्या: अच्छा... ओके... हम्म्म.. पण अचानक का आठवली तुला ही गोष्ट???

बंड्या: अरे, मी आईबरोबर बाजारात जायचो ना. ती घेऊन जायची मला पिशव्या उचलायला आणि बाजारभाव कसा करावा ते कळावं म्हून. लई वैताग याय्चा राव. एक रुपयासाठी घासाघिस करायची. मी तिले बोलायचे कशाला करतेस एका रुपयासाठी तंटा. दे की सोडून. एका रुपड्यात काय ती भाजीवाली महाल बांधणारे की तु श्रिमंत होणारे?? ती चिडायची. तुला काय समजत नाय म्हणुन मलाच गप्प करायची.

गुंड्या: बरं मग???

बंड्या: परवा आफिसात जाताना म्हटलं वेफर्स घेऊ. कायतरी आपलं तोंडात टाकायला असलं की बरं असतं. मी घेतले आपले पाव किलो. ४५ रुप्ये झाले. मी १०च्या ४ नोटा आणि चिल्लर संपवायचे म्हून २ची ३ नाणी असे ४६ रुप्ये दिले. काकांनी वेफर्स दिले बांधून आणि लागले दुसऱ्यांच्या पुड्या बांधायला. मला वाटलं देतिल सुटा एक रुपया परत. मी थोडावेळ थांबून म्हटलं, काका मी पुरे ६ रुप्ये दिलाव. एक रुपाया परत करा. त्यांच्या ध्यानात नव्हतं आलं मी ६ रुप्ये दिलेत ते. त्यांना वाटलं मी सुटे ५च रुप्ये दिलेत. अच्छा असं का म्हून हसले आणि दिला एक रुपाया परत. लई येगळाच लखलखला रं तो रुपाया.

गुंड्या: बरं मग??? पुढे...

बंड्या: फुडे???!!! फुडे काय फुडे??!!! काय तुला किर्तन ऐकवून रायलो की रामायण महाभारतातल्या गोष्टी?? त्या सांगून संपल्यावरपण विचारशील फुडे??? तुला इतकावेळ काय सांगितलं ते काय झेपलं की नाय???

गुंड्या: (कान खाजवत) बंड्या... तु नोकरीला लागल्यापासून जाम बोर झालाय्स. काय बोलतोय्स मला काही समजत नाहीये.

बंड्या: (कपाळावर हात मारुन घेत..) हाय का... म्हन्जे गाढवासमोर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता म्हनाय्ची वेळ आणलिस माज्यावर...

गुंड्या: गप रे.. कसल्या म्हणी ऐकवतोय्स... आणि हे असं गावरान भाषेत का बोलतोय्स???

बंड्या: (नंदीबैलासारखं डोकं डुलवित) काय नाय असंच... गेले दोन दिवस मकरंद अनासपुरेचे चित्रपट बघुन रायलो त्येचाच पारिणाम असावा...

गुंड्या: (वैतागुन) चल निघायचं का??

बंड्या: निघू...

गुंड्या: अण्णा किती झाले...

अण्णा: दोन कटींग... ४ रुपये...

गुंड्या: हे घ्या..

(गुंड्याने अण्णाच्या हातावर ५ रुपये टेकवले आणि परत दिलेला १ रुपया नं घेताच निघाला. तसा...)

बंड्या: अरे, १ रुपया घे की परत...

गुंड्या: !!! अरे.. चल... वेडा का??? हॉटेलात जातोस ना??? टिप दिलिये ती.. चल...

(बाजुने तिन आणि वर एक असे चार पत्रे टाकून हॉटेल होतं ह्याचं नसेल वाटलं त्याहून जास्त गुंड्याच्या वागण्याचं नवल बंड्याला वाटलं. आणि आपण काय बोलत होतो ते गुंड्याला खरंच काहीच समजलं नाही हेपण कळालं.)

बंड्या: लेका... टिप द्यायला तु कधीपासून कमवायला लागला रे???

गुंड्या: बंड्या, साल्या काय पकवतोय्स... चल... रद्दी आपली हक्काची कमाई आहे. कालच विकलीये. २०० रुपये मिळालेत.

अस्सं म्हणुन बंड्यानं त्या रुपयाकडे एकवार नजर टाकली. तो पुन्हा तसाच लख्खकन चमकला. बंड्या हसला... आणि त्याला पाठमोरा होऊन चालायला लागला....

आपला,
(एक रुपयाधिश) सौरभ

-> कान -> मेंदू -> कान ->

एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देणं वाटतं तितकं सोपं नसतं यार... च्यायला हा साला मेंदू नेहमी मधे येतो....

आपला,
(Drilled) सौरभ

विडंबन

0 प्रतिक्रिया
मेघच्या ब्लॉगवर एकदा एक विडंबन केलेलं. आज उगीच आळवतोय...

मूळ गाणं: भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...
हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला
देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

अन् हे ते विडंबन:

तिष्ठणे इथले संपत नाही, मी अजूनी बेरोजगार पडूनी आहे,
दिवस रात्र मी केलेली, ऍप्लिकेशन्स तशीच पेंडिंग आहे...
मी करे अर्ज नोकऱ्यांचा, अन ह्यांतच वेळ जातो वाया,
नाहीच कसला प्रतिसाद, जराशीही उमेद जागवाया...
ह्या रिसेशनच्या नाजूक वेळी, नोकऱ्या गमावून बसती,
हाती घेऊन रिझ्यूमे, दारोदारी कंपन्यांच्या फिरती...
हा झोल नियतीचा सगळा, आयुष्य रखडवूनी गेला,
आर्थिक मंदीच्या दुष्काळात जणू, तेरावा महिना आला...
जाऊनी पलिकडे सगळ्याच्या, मी म्हणे स्वतःला जरा थांब,
कोरड पडली घशास माझ्या, मी इतकी मारली बोंब...
बिगारी कामातील मजूरासम, मी झटलो हो नेटाने,
डोक्यात घालती गोंधळ, विचारांचे अगणित भुंगे...
बधिर इंद्रिये अवघी, हरपुन भान जाणिवांचे,
हे सरता संपत नाही, ग्रहण माझ्या दुर्दैवाचे...
हे सगळे अवेळी होते, फास्यांनी चुकविली खेळी,
मेंदुत राहीली माझ्या, विणलेली कोळ्यांची जाळी...


आपला,
(लय बेक्कार) सौरभ

शेंबड्या नाकाच्या आणि बोबड्या ओठांच्या कविता...

2 प्रतिक्रिया
शाळेत असताना मी काही कविता केलेल्या आणि एका वहीत लिहून ठेवलेल्या. ती वही सापडली. कविता वाचल्या तेव्हा भारी हसायला आलं. उगीच काहिही यमकं जुळवून कविता केल्यात. ह्या कविता पुर्णपणे विस्मृतीत गेलेल्या. वही मिळाली तशी लगेच स्कॅन करुन घेतली. ज्यांच्याबोवती तुटक बॉर्डर आहे त्या इतर कुठेतरी वाचलेल्या, आवडलेल्या म्हणून नोंद करुन ठेवलेल्या होत्या. तरी आयुष्यात जी पहिली कविता केलेली ती ह्यात नाही. पण माझ्या लक्षात आहे. अशी होती ती...

लहान बाळाला असते काय अक्कल
चड्डीचे सुटले असते त्याचे बक्कल
नीट नसते धड त्याची चप्पल
त्याला असते एक गोलगोल टक्कल
टकल्यात काय शिरणार अक्कल
म्हणून तो करतो साऱ्यांची नक्कल

बाकिच्यांची स्कॅन्ड कॉपी खाली देतोच आहे.




आपला,
(हाप चड्डीतला) सौरभ

शेर आया... भागो भागो...

0 प्रतिक्रिया
बंड्या: मियाँ, अर्ज किया है...
गुंड्या: इर्शाद इर्शाद...
बंड्या: (पानाचा तोबरा थुकत) आँ थू थू थू थू...
गुंड्या: वाह वाह!!! वाह वाह!!!
बंड्या: मियाँ शेर यह नही था, वो तो अब फर्माऊँगा|
गुंड्या: ओह्ह अच्छा... इर्शाद इर्शाद...
बंड्या:
साला पिनेवाले होश संभाल ना सके, और शराब बदनाम हो गई|
कंबख़्त आशिक प्यार निभा ना सके, ख़्वामख़ाँ मोहोब्बत एक सजा हो गई|

गुंड्या: ईईईय्य्याक्क्क... च्यामायला ब्येकार येक्दम.. पला पला बालान्नू...

आपला,
(शेरु) सौरभ