१७ जुलैच्या रात्री (...तसा १८ जुलै चालु झालेला तेव्हा...) एक निशाचर प्राणी (...मी...) कधी नव्हे ते रात्री झोपायला गेला. (...हे काम मी शक्यतो तांबडं फुटल्यावर किंवा लोकांचे मॉर्निंग आलार्म वाजून वाजून बंद पडल्यावर करतो... कधी कधी झोपायला जाण्याआधी सकाळचा नाष्टा उरकून मगच जातो... उगीच उपाशी पोटी कशाला झोपायचं...) असो... तर वेळापत्रकात अचानक आलेल्या बदलामुळे मी रात्री लवकर झोपलो. आणि असं अवेळी झोपल्याचा परिणाम म्हणून कि काय मला एक विचित्र स्वप्न पडलं. तर झालं काय की...
त्या स्वप्नात मी एका अधो-उर्ध्वागमन वाहिकेत (...म्हणजे लिफ्टमधे...) होतो. माझ्याबरोबर अजुन ३-४ जण सोबतीला होते. १९-२०व्या मजल्यावर त्यात आणखी काही जणांची भर पडली. तळमजल्यावर जाण्यासाठी म्हणून कोणीतरी बटण दाबलं आणि आम्ही सर्वजण तळमजल्याकडे निघालो. पण तळमजल्याकडचा तो प्रवास किती रोमांचक असेल ह्याची मला त्या स्वप्नातदेखिल कल्पना नव्हती. खाली जाणाऱ्या त्या लिफ्टचा किमान वेग राजधानी एक्सप्रेसला मागे टाकेल एवढा होता. ह्या वेगाने तर मी डोळ्याची पापणी लवायच्या आत तळमजल्यावर पोहचायला पाहीजे होतो. पण मी झोपलेलो असल्याने डोळ्याची पापणी लवली नाही आणि ती लिफ्ट अशीच प्रचंड वेगाने खाली येत राहीली. लिफ्ट एवढ्या जोरात खाली का येत्ये हे न समजल्याने सगळेच गोंधळलेले होते. ह्या विस्मयकारक स्थितीत ५-१० मिनिटं गेली आणि अचानक कोणाला तरी साक्षात्कार झाला की लिफ्टची केबल तुटल्यामुळे आपण असे विद्युतगतीने खाली कोसळतोय. पण हे समजुनसुद्धा आमच्यापैकी कोणी घाबरलं नाही. कोणालाच काही फरक पडला नव्हता. सगळे शांत होते. मी एकटाच लिफ्टमधे उड्या मारत होतो. (...ह्याचं कारण म्हणजे मी कुठेतरी वाचलं होतं की लिफ्ट जर खाली कोसळत असेल आणि जमिनीवर आदळण्यापूर्वी तुम्ही उडी मारुन हवेत असाल तर होणाऱ्या आ(प)घातापासून तुम्ही बचावू शकता. हे मला तेव्हा आठवलं. आरे वाह... बघा बघा... म्हणून तुम्हीदेखिल वाचन सुरु करा आणि जरा सामान्य ज्ञान वाढवा. कधी कुठे उपयोगी पडेल सांगता येणार नाही...) अश्या काही उड्या मारल्यावर एकदाची ती लिफ्ट जमिनीवर आदळली. तिच्या आदळण्याने एक भिंत तुटून पडली जिकडून मी बाहेर फेकला गेलो. थोडी पडझड वगळता ईमारतीचं जास्त नुकसान झालं नव्हतं. लिफ्टमधल्या कोणालाच कसलीही ईजा झाली नव्हती. माझ्या मात्र डाव्या हाताला मार लागल्याने तो बधीर झाला होता. काहीच हालचाल न करता आल्याने तसाच दुमडुन ठेवला. डोक्यावर कुठेतरी छोटीशी चीर पडली होती. त्यातून थोडं (...थोडंच बरं का...) रक्त वहात होत. डोक्यावरुन हात फिरवताना हाताला ते लागलं. झालेल्या अपघाताच्या धक्क्याने माझं शरीर सणकून तापलं होतं. पण मला कुठेच दुखत खुपत नव्हतं. मी तसाच उठलो आणि बाकीच्यांशी बोलायला गेलो. त्यांच्याशी काही सल्लामसलत करुन झाल्यावर आम्ही सर्वांनी हॉस्पिटलमधे जायचं ठरवलं. तर ते हॉस्पिटल शोधण्यासाठी म्हणून आम्ही सगळे रस्त्यावरुन इकडे तिकडे सैरावैरा पळत होतो. मी पुढे आणि सगळे माझ्यामागे असे सैरभैर होऊन धावत होतो. कधी इकडे पळ, कधी तिकडे पळ, कधी ह्या तर कधी त्या कंपाऊंड वरुन उड्या मारत मी एका हॉस्पिटलमधे पोहोचलो. आता ते नक्की काय होतं मला माहीत नाही, पण माझ्यासाठी हॉस्पिटलच होतं. ४० वॅटचा बल्ब लावलेली एक खोली जिकडे सगळीकडे भाज्या आणि भांड्यांचा पसारा पडलेला. तिकडे एक ओटा होता ज्यावर गॅसची शेगडी, बाकी पसारा आणि त्याच्याखाली धान्य साठवून ठेवलेले मोठे डबे होते. तिथला कंपाऊंडर ताट-वाट्या पूसुन नीट ठेवत होता. लोकांसाठी जेवणाची ताटं तयार करत होता. माझ्याकडे ढुंकुन बघायलासुद्धा त्याच्याकडे वेळ नव्हता. त्याने मला पुढे पाठवलं. पुढे एक डॉक्टरीणबाई छोट्या स्टुलावर बसून समोरच्या चुलीवर शिजत ठेवलेल्या मोठ्या भांड्यातली भाजी ढवळण्यात मश्गुल होत्या. एकंदर कोणत्यातरी खाणावळीचा मुद्पाकखाना शोभेल असं ते हॉस्पिटल होतं. मला बघून डॉक्टरीणबाई म्हणाल्या, "जरा बैस. मी ही भाजी झाली कि येतेच." तिच्या आश्वासनाने आश्वस्त होऊन मी समोरच्या एका पायरीवर बसलो. (...पायरी कुठुन आली ते नका विचारु...) तर असाच बसल्या बसल्या मी माझ्या मार लागलेल्या हाताकडे बघायला लागलो आणि अलगदपणे माझे डोळे उघडले.
मला जाग आलेली. कदाचित बराच वेळ डावीकडे कुशी करुन झोपलेलो, त्यामुळे अंगाखाली आलेला डावा हात बधीर झाला होता. दोन-दोन चादरी अंगावर असल्याने मी प्रचंड घुसमटला गेलो होतो. आणि मला भुक लागल्याचीदेखिल जाणीव झाली. २ मिनिटं मी स्वतःवर हसावं कि रडावं ह्या संभ्रमात होतो. तेवढ्यात आर्चिसच्या बंद खोलीतून त्याच्या खिदळण्याचा आवाज आला. दुसऱ्या खोलीत अमित त्याच्या लॅपटॉपवर कोणतीतरी मुव्ही बघत बसलेला. मी सकाळी ४.१५-४.३० वाजता ह्या स्वप्नामुळे टक्क जागा होऊन बसलो होतो. झोप उडाल्याने आता काय करायचं म्हणून काही मिनिटं तसाच बसलेलो. आणि मला एक मस्ती सुचली. मी ह्या दोघांना घाबरवायचं ठरवलं. अमित त्याच्या लॅपटॉपमधे डोकं खुपसुन बसला होता. मी हळूच उठलो आणि दबकत दबकत त्याच्याजवळ गेलो. अचानक लॅपटॉपची स्क्रिन फोडून कोणी भूत बाहेर यावं तसा समोर जाऊन जोरात बोंबललो. (...त्याची अवस्था काय झाली असेल ह्याची तुम्ही कल्पना केलेलीच बरी...) मला त्याने शिव्या ऐकवल्या तो भाग वेगळा. पण मी आपला खोखो हसत होतो. त्याला शांत करुन नंतर मी माझा मोर्चा आर्चिसकडे वळवला. तो त्याच्य खोलीत हेडफोन लावून कोणतीतरी कॉमेडी मुव्ही बघत हसत बसलेला. त्यामुळे बाहेर काय चाल्लय ह्याची त्याला काहीच कल्पना नव्हती. तो आपला त्याची त्याची मुव्ही एन्जॉय करत होता आणि मी जोरात त्याच्या खोलीचा दरवाजा उघडुन धाडदिशी आत शिरलो. इतका वेळ तो मुव्ही बघून हसत होता आणि आता मी त्याला बघून हसत होतो.
सकाळी ४.४५ला हे सगळे उद्योग चालले होते. मला पडलेलं स्वप्न दोघांना ऐकवल्यावर "अरे, काय फालतूगिरी आहे..." म्हणत हसत होते. मी मला पडलेल्या ह्या स्वप्नामागचं लॉजिक शोधायचा प्रयत्न करत होतो. स्वप्नात मार लागून सुन्न पडलेला हात झोपेत बधिर झाला होता. त्यातल्या अपघातात मी ज्यामुळे तापलो होतो त्याला खोलीतली गरमी कारणीभूत होती. झोपतेवेळी थंडी होती म्हणून मी दोन चादरी ओढून घेतल्या होत्या. आणि रात्री अचानक उकाडा वाढल्यामुळे मला जो घाम आला होता तो स्वप्नात मला झालेल्या जखमेतून रक्त म्हणून वाहत होता. सगळ्यात अतिरेक म्हणजे झोपेत मला लागलेल्या भुकेचा परिणाम म्हणून मला ते हॉस्पिटल एखाद्या खाणावळीसारखं दिसत होतं. औषधांच्या जागी जेवण दिसत होतं. हैराण होऊन "खरंच... काय फालतूगिरी आहे..." म्हणत मी त्या स्वप्नाचा विचार करणं सोडलं आणि निमुटपणे कॉफी बनवायला घेतली...
आपला,
(स्वप्नाळू) सौरभ
8 प्रतिक्रिया:
waah re bandyaa! swapnaat pan khanna suchayla laglay!! tyat pan khanaval :))
Pakka petu ahes re tu.we will miss u while eating all the karanjees, modaks, ladoos, chivdas, jilbhis, gulab jamuns......this festive season!!! Chann swapna hota bara ka!! hahaha
हो, नक्की आठवण काढा माझी आणि दोन-चार जास्तच खाऊन घ्या... साला मला तर भीती वाटत्ये की मी जेव्हा परतेन तेव्हा पब्लिक विचारेल "काय रे नक्की ला होतास की सोमालियामधे???"
सारखं आपलं "अण्णा जेवायला जेवायला जेवायला" म्हणत भूक भूक भूकत असतो...
अरे मस्त रे... स्वप्नातल्या गावा जावे... :) हल्लीच इंसेप्षन पाहिलेला आहे.. तेंव्हा म्हटले आता हा 'सपनेमे सपना' बघतो की काय... आणि लिंबात जातो की काय!!! :) हा हा ...
हाहा.. मी इंन्सेप्शन अजुन पाहिला नाही. पण ह्या highly realistic स्वप्नांचा बऱ्याचदा अनुभव आलाय.
तुझं स्वप्न वाचत असताना मी मनात त्याचा जो काही सत्यातील घटनाक्रम लावत होते, तो बऱ्याच प्रमाणात तू जागा झाल्यावर जो काही विचार केलास त्याच्याशी जुळणारा होता!!
:D अशी बरीच मजेशीर स्वप्न आहेत. एकदा मी स्वप्नात घरी गेलो आणि मस्तपैकी जेवत होतो आणि झोपेतच हसत होतो. हळुच जाग आली तेव्हा माझा मित्र माझ्याकडे बघुन हसत होता. :D
स्वप्नात पाहिली राणीची बाग
हत्तीच्या पाठीवर बसला नाग
सिंह होता व्याख्यान देत
गाढव होते उतरून घेत
कोल्हा होता दुकानदार
त्याच्या दुधात पाणी फार
मला पाहताच म्हणाले सारे
एक पिंजरा ह्याला द्या रे
त्याचबरोबर आली जग
स्वप्नात पाहिली राणीची बाग
-विं. दा. करंदीकर
:)
Post a Comment