कवितेची कत्तल

मला बनवायचीये एक दुःखीकष्टी क्लिष्ट कविता.
म्हणुन मी आणलेत काही हुंदके आणि उसासे.
प्रेमात विव्हळणारी आणि दुःख कुरवाळणारी माणसे.
पोळणारा पाऊस, बोचणाऱ्या आठवणी.
उडालेले रंग, अर्धवट राहिलेली कहाणी.
पाहिलेली स्वप्न ज्यांच्या ठिकऱ्या उडाल्या.
नात्यांची बंधन ज्याच्या चिंधड्या झाल्या.
आणला एकटेपणा तो जो आयुष्यभर पुरला.
सोबत अपयशाचा करंडक ज्याला डोईवर मिरवला.
जितक्या होत्या यातना वेदना त्या सगळ्या मिळवल्या.
एकमेकांत मिसळुन कालव कालव कालवल्या.
एकजिनसी मिश्रण ते भोवताली वाटले.
आसवं डोळ्यात आणत त्यांनी चवीनं चाखले.
प्रेमळ माणसं ती, मनभरुन वाटून खाल्लं.
माझंच दुःख माझ्यासाठीच नाही उरलं.
भरलेलं पातेलं चाटूनपुसुन लख्ख केलं.
परतफेड म्हणुन प्रेमानं पुन्हा भरुन दिलं.
मला आश्चर्य वाटलं, ते कोणीच गंभीर नव्हते.
तृप्त समाधानी असल्यासारखे सगळेच हसत होते.
आयला हे तर मॅटरच उलटं झालं.
मला अपेक्षित होतं एक आणि भलतच काही घडलं.
म्हटलं अरे हसताय काय? तुम्ही रडावं म्हणुन मी दुःखी कविता केली.
त्यावर अजुनच हसत ते म्हणाले, "अरे त्या कवितेची आम्ही कधीच कत्तल केली."
दुःखी होणं आमच्या स्वभावात बसत नाही.
कोणी झालेलं आपल्याला बघवत नाही.
दुःखपण सालं दुःखी, सगळेच त्याची हेटाळणी करतात.
दुःखालापण आम्ही गोंजारतो, मग तीपण खुदकन हसतात.
आता दुःखच जर हसलं, तर आम्ही का बरं रडावं???
हसावं आणि हसवावं, असंच आपण जगावं...


आपला,
(कातिल) सौरभ