विचित्र स्वप्न

8 प्रतिक्रिया
१७ जुलैच्या रात्री (...तसा १८ जुलै चालु झालेला तेव्हा...) एक निशाचर प्राणी (...मी...) कधी नव्हे ते रात्री झोपायला गेला. (...हे काम मी शक्यतो तांबडं फुटल्यावर किंवा लोकांचे मॉर्निंग आलार्म वाजून वाजून बंद पडल्यावर करतो... कधी कधी झोपायला जाण्याआधी सकाळचा नाष्टा उरकून मगच जातो... उगीच उपाशी पोटी कशाला झोपायचं...) असो... तर वेळापत्रकात अचानक आलेल्या बदलामुळे मी रात्री लवकर झोपलो. आणि असं अवेळी झोपल्याचा परिणाम म्हणून कि काय मला एक विचित्र स्वप्न पडलं. तर झालं काय की...

सुरुवात... गणपती बाप्पा मोरया...

18 प्रतिक्रिया
(...सौरभवाडीत सौरभच्या कट्ट्यावर माझं भाषण... भाषण ऐकायला अख्खा गाव जमलाय... वेळ ०३.४८am...)

माझ्या (अ)रसिक मित्रांनो आणि मैत्रिणींनो... २३ एप्रिल २००६ हा दिवस ब्लॉगस्पॉट.कॉम च्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहला जाईल असा आहे. ह्या दिवशी ब्लॉगस्पॉट.कॉम वर अनेक ब्लॉग नोंदवले गेले असतील, पण भरीस भर म्हणून ह्या भाराभर ब्लॉगमधे माझ्या ह्या ब्लॉगची भर पडली. आणि तेव्हापासून सलग ३ वर्षांहून जास्त हा ब्लॉग सातत्याने निष्क्रिय आहे. आणि त्याचं सारं श्रेय जातं ते ह्या ब्लॉगच्या निर्मात्याला, अर्थात मला. (...टाळ्यांचा कडकडाट...) तर गेली ३ वर्षांहून जास्त निपचित पडून असलेल्या ब्लॉगची शांतता आज मी भंग करणार आहे. (...श्रोत्यांमधे कुजबुज...) आज ह्या ब्लॉगवर मी काहीतरी खरवडणार आहे. ती खरवड/खरखोड/खाडाखोड काय असेल हे मला अजुन माहित नाही. पण सद्ध्याच्या घडामोडींबाबत गंभीर चर्चा (...हे ऐकून सारे श्रोते ख्यॅं ख्यॅं ख्यॅं करुन विकृत हसतात...) मनातले विचार (...शक्यतो चांगले, चार लोकांत सांगता येतील ते...), अगदीच काही नाही तर, काही ना काही विषय काढून ह्या चव्हाट्यावर मांडण्याचा प्रणय मी केला आहे. (...मी प्रणय केला आहे हे ऐकून सभागृहात एकच हास्यकल्लोळ... बावळट कुठला, म्हणून लोकांच्या प्रतिक्रिया... झालेली चुक लक्षात येताच लगेच सावरुन...) माफ करा निश्चय केला आहे. (...कापूरवडी सारखा ह्याचा निश्चय कधी उडून जाईल समजणारपण नाही... मधेच एक खवट बाई पचकली...)

तर आज १६ जुलै २००९ रोजी ह्या निश्चयाचा श्रीगणेशा म्हणून मी ह्या ब्लॉगमधे काही तरी लिहायचा प्रयत्न करणार आहे. माझं डोकं सुपिक नसल्याने ह्यात तुम्हाला कसदारपणाचा अभाव जाणवेल. पण जे आहे ते गोड मानून घ्या.
म्हणायला हा ह्या ब्लॉगचा दुसरा पोस्ट असला तरी पहिल्यांदाच मी स्वतःचं असं काहीतरी खरवडतो आहे. तर आता तुम्ही विचाराल की अचानक ३ वर्षांनंतर मला काय हुक्की आली की मी हा ब्लॉग लिहायला घेतलाय. विचारा... विचारा की... (...का लिहायला घेतलाय??? सर्व श्रोत्यांनी सामूहिकपणे प्रश्न विचारला...)

हम्म्म्म... खरं सांगायचं तर मला ब्लॉग लिहीत बसण्याची अजिबात हौस नाही. हे खुप कष्टाचं काम आहे. आणि लिहण्यासाठी बराच विचार करावा लागतो, जो मी अजिबात करु शकत नाही. (...हे अगदी खरं आहे... आलेल्या पाहुण्यांपैकी एकजण लगेच माझ्याशी सहमत झाला...) पण तरी आज लिहीतो आहे. (...बऱ्याच श्रोत्यांच्या कपाळावर आठ्या... काहींनी त्या आठ्या झाकायला कपाळावर हात मारुन घेतला...) ह्या लिखाणाचं कारण म्हणजे मेघ. (...श्रोत्यांच्या चेहऱ्यांनी प्रश्नचिन्हाचा आकार घेतल्याने काहीसे वेडेवाकडे झाले...) मेघ म्हणजे आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या. तिला वाटत कि मी चांगलं लिहीतो. (...हे ऐकून एका वृद्धाच्या छातीत कळ आली...) म्हणून तिने हट्ट केलाय आणि मला ४ तासांची मुदत दिली आहे. (...लोकांमधे प्रचंड नाराजी...) आणि आता ०३.३०-०४.०० am वाजता मी काय लिहू त्याचा विचार करतोय. तर ब्लॉगचा श्रीगणेशा म्हणून हा पहिला स्वलिखित पोस्ट मेघच्या नावे. (...टाळया...) मी जरा तिची ओळख करुन देतो. मेघचं नाव मेघ नसून केतकी आहे. पण तिला मी मेघ म्हणूनच बोलावतो. मेघ माझी एकदम खास जुनी मैत्रिण आहे. सद्ध्या भारत फोर्ज ह्या कंपनीमधे कॉर्पोरेट एक्झिक्युटिव म्हणून कार्यरत आहे. ती एक खुप गुणी लेखिका आहे. खुप सुरेख कविता करते. एकाच वेळी दोन भिन्न आणि एकमेकांच्या अगदी विरुद्ध व्यक्तिमत्व तुम्हाला तिच्यात पहायला मिळतिल. sounds complecated... जाऊदे... जास्त विचार करु नका. तिला भेटलात की समजेल. तर आज तिच्या आग्रहा आणि प्रेरणेमूळे मी हा लेख लिहण्याचे धाडस करीत आहे. (...सभागृहात शांतता... एक कार्यकर्ता श्रोत्यांना हातवारे करुन टाळ्या पिटण्याचे ईशारे करतो... टाळ्या पडतात...) धन्यवाद... धन्यवाद...

हम्म्म... तर आता पुढे काय... (...श्रोत्यांचे चेहरे पुन्हा प्रश्नचिन्हासारखे वाकडे...) अरे... म्हणजे हा प्रश्न नाही. पुढे काय म्हणजे आता पुढे काय लिहायचं ह्याचा विचार मी करतो आहे. (...बराच विचार करुनही काही न सुचल्याने सभागृहात शांतता... अचानक कार्यकर्त्याचा फोन वाजतो... दबलेल्या आवाजात काहीतरी बोल्ल्यावर तो माझ्याजवळ येऊन माझ्या कानात सांगतो... साहेब पिक्चर पुर्ण बफर झालाय... पब्लिकला भूक लागलेली दिसत्ये... तुमचे विचार आपण नंतर कधीतरी ऐकवू त्यांना... आता समारंभ आटोपता घ्या... पब्लिकला चहापाणी करुन जाऊद्या... आता ७.०५ होत आले... आपणपण कॉफी घेऊ थोडीथोडी... पुन्हा फ्रेश डोक्याने लिहता येईल... काय???...) हम्म्म... ठिक आहे...

तर मित्रहो... पुढे काय म्हणून विचार करत बसायची ही वेळ नाही. आता आपण कामाला लागलं पाहिजे. जाण्यापुर्वी आपल्या प्रमुख अतिथि मेघबाईंचा नारळ, सुर्यफूल (...अर्र्र्र्र्र्र्र्र्र्...) माफ करा फूलगुच्छ देऊन सन्मान करतो. त्यांचं मार्गदर्शन सतत लाभेल अशी आशा व्यक्त करतो. तुम्ही आज मोठ्या संख्येने इकडे गर्दी करुन आलात... आम्ही भरुन पावलो. तुमचे आशिर्वाद असेच असू द्या. सौरभच्या ह्या कट्ट्यावर (...चव्हाट्यावर म्हणा हवं तर...) रोजच्या दिवसासारखे नवीन ताजे, सिंहगडावर मिळणाऱ्या कांदाभजीसारखे खुसखुशीत मुद्दे येतच राहतील. तुम्ही सर्वांनी त्या चर्चेत आवर्जून भाग घ्यावा ही विनंती करतो. आणि तुमची रजा घेतो...
धन्यवाद...

(...जमाव पांगतो... गर्दी ओसरते...)

आपला,
(वक्ता) सौरभ