बॉडी लॅंग्वेज to मिडिया लॅंग्वेज

9 प्रतिक्रिया
आनंदने माझा पोस्ट गुगल बझ्झवर टाकल्यापासून माझ्या ब्लॉगवर एकच धमाल उडालीये. जास्तीत जास्त आठवड्याभरात ६-८ पेजव्ह्यू असलेल्या ह्या ब्लॉगला एकाच दिवसात २००चा आकडा पार होण्याइतपत पेजव्ह्यू मिळाले. आकाशच्या भाषेत सांगायच झालं तर 'आ.प.'ने बझ्झवर एक लिंक पोस्ट काय केली आणि ब्लॉगवर व्हिजिटर्सचा एक ढग बरसून गेला. माझ्यासाठी वाळवंटात पूर येण्यासारखी हि गोष्ट. असो. मला लय भारी वाटलं. एवरेस्ट कुल्याखाली आल्यासारखं. मनाला अनेक लाडू फुटून त्याच्या चुर्णाने सारावल्यासारख्या गुदगुल्या झाल्या. दिलात अनेक चॉकलेट आईसक्रिमचे ज्वालामुखी फुटले. Thank you आनंद. (गळाभेट)
आकाशने आधीच्या पोस्टला एक जालिम हजरजबाबी पोस्ट लिहला. तो मी इकडे जस्साच्या तस्सा टाकतोय.

---------------------------------------------------

आता हे लिहलं तर खरं, पण जर हा पोस्ट सुपर हिट झाला, तर काय रे? > तू NEWS मध्ये झळकशील लेको!!
अश्या अमुक अमुक ब्लॉग मध्ये एक ब्लॉगर आपल्या उपासमारीचे हे वर्णन करतोये बघा!

मग एक डॉक्टर बोलेल > "मला वाटतं ह्याला जर रोज पुरे पूर आहार दिला तर हा पुन्हा एकदा ठणठणीत होऊ शकतो."

मग कॅमेरा इंडियन ऍम्बॅसीच्या ऑफिसवर
"हम पुरी कोशिश कर रहे हैं, की इस संगणकीय अभियंता को हम अपने देश में लाया जाये, और उसका पुनर्वसन करे."

राजसाहेब ठाकरे: "बघा सांगत होतो, त्या अमेरिकेतल्या गोऱ्यांची चमचागिरी करू नका, बघा आज माझा हा बंधू काय उपभोगतोय."

मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण : " हि खूपच गंभीर बाब आहे."

ठाणे रेल्वे स्थानकावरील एक प्रवाशी: "हे भारतीय नौकर वर्गाचा शोषण आहे, त्यांच्या ह्या हावरट वागणुकीचा जवाब त्यांना द्यावाच लागेल."

एक काळा कोट घातलेला म्हातारा वकील: "बघा आम्ही त्या कंपनीला आमच्या तर्फे एक leagal notice पाठवली आहे. जशी पुढे कारवाई होईल तुम्हाला कळवण्यात येईल."

बंड्याचा वर्गमित्र: "नाही, आधी तो चांगला तंदुरुस्त होता. त्याला डबा खायची वेळ इतकी प्रिय होती, की तो शाळेला मधल्या सुट्टीच्या १० मिनिट आधी यायचा."

बंड्याचे शेजारी: "आधी कसा तब्येतीत होता. आमच्या वडलांना एकदा पाय अडकवून पाडून कसा पसार झाला होता! नाही, त्याच्या वडलांनी पैसे दिले आम्हाला. तसं मामुली fracture झालं होतं. हिवाळ्यात दुखत अधून मधून. आमची धाकटी मग बाम लाऊन देते."

तुम्ही पाहत होता हा exclusive report फक्त "बोगस न्यूज" वर!
cameraman गुंड्या बरोबर मी "आचरट"

- आकाश

---------------------------------------------------

आता हा आकाश कोण? आकाश गुप्ते. माझ्या पहिल्या वर्तुळात येणारा मित्र. कलंदर हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणा किंवा बिलंदर कार्ट, both things define him. त्याच्या http://amritasyaputra.blogspot.com/ ह्या ब्लॉगला भेट देऊन बघा. तुम्हाला त्याच्याबद्दल थोडी कल्पना नक्किच येईल. ;) :)

आपला,
(आकाशमित्र) सौरभ

बॉडी लॅंग्वेज

20 प्रतिक्रिया
"काय रे ढेऱ्या... काही अक्कल आहे कि नाही तुला?" बंड्याच्या डोस्क्याने विचारचक्राला थोडा ब्रेक मारुन थांबवून बंड्याच्या पोटाला विचारलं.
"का... काय झालं?" बंड्याचं पोट AKA ढेऱ्या.
"अरे काय बघावं तेव्हा डुरडुर डरकाळ्या मारतोस. ऑ?"
"मग काय. च्यायला एक तर दिवसभर रिकामं ठेवायचं. काही खायला नाही. मग काय करणार?"
"अरे पण काय साला कधीही चालू व्हायचं? कधी कुठे केव्हा गुडगुडावं काही काळवेळ आहे कि नाही?"
"ते मला काही माहित नाही. टायमावर मला कायतरी पचवायला मिळालं तर मी अशी गुडगुड करणार नाही. साला काय अवस्था झालीये. ते हात आणि पाय बघ. हात अगरबत्ती और पाव मोमबत्ती. त्या पायांना ५ मिनिटं धावता येत नाही आणि हातांना जरा वजन पेलवत नाही."
"अय... आम्हाला काय बोलायच नाय काय.." बंडूचे हातापाय स्वतःला झटकून संभाषणात उतरले.
"मी धावेन मैलभर. पण तो छाताडातला पंप जास्त धडधडायला लागतो. त्याची चोंदलेली पाईपलाईन दुरुस्त करा." - बंडूच्या तंगड्या
"हो. आणि मी उचलेन मणभर वजन. पण त्या कंबरेने आणि पाठीने कच खाल्ली. जरा आपलं वजन उचलून २ इंच वर काय गेलो तर त्या मणक्यांची माळ सैलावली. द्याव लागलं मग सोडून." बंड्याच्या हातांनी त्यांच्या रत्ताळ्यासारख्या स्नायूंचा उगीच फुगा फुगवला.
"ओ दंडाधिकारी, पंक्चर झालेल्या टायरमधे उगीच हवा भरायचा प्रयत्न नका करु." वासाड चाळीतले ३२ चाळकरी दात फिदफिदले.
"गपता का आता. का हाणू दोन आणि काढू सगळ्यांना बाहेर." हाताची बोटं मोडता मोडता कडाडली.
"हाय का हिंमत तेवढी?" दातांनीपण ओठ खाल्ले.
"च्यायला, परवाच तोंडावर उताणा झालेला तेव्हाच ढेपाळणार होता."
"पण ढेपाळलो का? साला ह्या डोळ्यांचा फोकस बिघडला म्हणून आपटलो. ढापण लावूनपण धड बघता येत नाही."
हे ऐकून डोळे वाटारले. "ये बत्ताश्या. जास्त बोल्लास. माझा फोकस नीटच होता. त्या कानांचे फाटलेले पडदे बदला. मागून जोरजोरात मारलेला हॉर्न आणि बोंबा ऐकू आल्या नाहीत त्यांना. आणि दिली गाडीने धडक तिच्याआयला."
"ए वाट्टाण्या, ऐकून घेतो म्हणून काय वाट्टेल ते ऐकवशील काय?" कानाच्या पाळ्या लालगरम झाल्या. "तो हेडफोन घालून फुल्ल व्हॉल्यूममधे हार्डरॉक लावून एकतर ते माझे पडदे बधिर केलेले. अश्यावेळी ढुंगणाखाली बॉम्ब फोडला असता तरी मला समजणं शक्य होतं का रे?"
"अरे काय चाल्लय काय? आपण सगळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतोय. अरे एकाच शरीराचे अवयव आपण. असं आपापसात भांडून कसं चालेल?" डोस्क्याने एक समजूतदार विचार मांडला.
"बरोबर आहे तुझं डोस्क्या. पण ह्या बंड्याने आपली काही काळजी घेतली पाहिजे की नाही? आता तु एवढा विचारवंत. नेहमी कामात असलेला. तुझीपण फिकर नाही त्याला. साला पुर्वी कसा काळ्याकुळकुळीत घनदाट केसांनी अच्छादलेला होतास तु. आता तेपण पांढरे पडायला लागलेत. विदर्भाच्या भेगाळलेल्या जमिनीसारखी त्वचा कोरडी होऊन कोंडा झालाय. अरे किती प्रॉब्लेम्स, कधी सुटणार हे प्रॉब्लेम्स???" सारं शरीर गलबललं.
"सुटतील... सुटतील..." डोस्क्याने स्वतःला शक्य तितकं शांत ठेवत म्हटल. "ह्या बंड्याच्या मनानं एकदा उचल खाल्ली पाहिजे. आपण त्यालाच विचारुया."
"बोल मना.. बोल... आमची हि अशी दुरावस्था कधी दूर होणार? सांग..."
इतका वेळ शांत असलेल्या बंड्याच्या मनाची थोडीशी चलबिचल झाली. "हम्म्म्म... मला समजतय. सगळं जाणून आहे मी. ह्यासाठी सगळा आळस झटकून आपण सर्वजण सक्रिय होणं गरजेचं आहे. हि बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. मी काय म्हणतो. आता ज्याम झोप आल्यासारखी वाटत्ये. उद्या उठल्यावर ताजातवाना होऊन मगच काय ते तुम्हाला सांगतो. चला मग... तोवर एक मस्तपैकी झोप काढुयात का?"
झोपेचं नाव काढताच हो हो म्हणत सगळेच अवयव गळून पडले. हातांनी थोडं लांब होत लाईट बंद केले आणि चादर ओढून घेतली. तंगड्यांनीपण पटकन स्वतःला चादरीत दुमडून घेतलं. डोळ्यांनी ताबडतोप शटर ओढून घेतले. कानांनी पडदे झटकून घडी घालून ठेवले. डोस्क्याने त्याचा कंप्यूटर स्लिपमोडमधे टाकला.

शरीरसंपदा आणि आरोग्यविकासाचा ऐरणीवरचा प्रश्न नेहमीसारखाच उद्यावर टाकून बंड्याचं धूड झटक्यात निद्राधिन झालं.

आपला,
(Fit & Fine) सौरभ