२६/११/२००८

1 प्रतिक्रिया

२६/११/२००८ ला झालेल्या मुंबईवरील हल्ल्यातील सर्व हुतात्म्यांना भावपुर्ण श्रद्धांजली आणि मानवंदना

आपला,
(नतमस्तक) सौरभ

प्रेशर

2 प्रतिक्रिया
(मला जरा वैतागून बसलेलं पाहून बंड्यानं माझ्या पाठीवर थाप देत विचारलं...)
काय रे, काय झालं? तब्ब्येत ठीक नाहीये का?
मी: काय सांगू बंड्या, आजकाल ऑफिसमधे पाय ठेवला रे ठेवला की प्रेशर जाणवतं.
बंड्या: काय बोलतो???!!!
मी: अरे नाहीतर काय. अगदी संध्याकाळी उशीरा ऑफिसमधून निघेपर्यंत प्रेशर असतं.
ऑ!!! पण तु दिवसभर प्रेशर सहन करत ऑफिसमधे कसा काय रे बसू शकतोस??? (बंड्याने निरागसपणे विचारलं.)
मी: काय करणार? (उसासा टाकत...) नाईलाज आहे... बसावं लागतं.
(दोन्ही हात वर करुन, ताणत मी मस्तपैक आळस दिला.)
अगदीच अस्वस्थ झालं तर सरळ ब्रेक घेतो. फ्रेश होऊन आलं की पुन्हा काम चालू.
त्यापेक्षा मग घरी का नाही आवरत तु??? (बंड्याचा प्रेमळ सल्ला.)
मी: छ्यॅ छ्यॅ (म्हणून मी बंड्याला उडवून लावलं)... मी ऑफिसमधेच सगळं उरकतो आणि मग येतो.
ऑफिसमधेच??? (गडबडलेल्या बंड्याची मान कावळ्यासारखी तिरकी झालेली.)
मी: ही ऑफिसची कामं ऑफिसमधेच करायची. उगीच घरी कशाला त्याचा व्याप.
ऑफिसची कामं!!!??? आणि ही अशी???!!! (बंड्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य, गोंधळ, प्रश्न, अविश्वास आणि ईईई शी बाबा अश्या टाईपचे सगळे भाव एकवटून आलेले.)
मी: मग काय... असतात एक एक कामं. ऑफिसच्या कामांचं प्रेशर काय असतं हे तु ऑफिसला जायला लागशील तेव्हाच समजेल.
बंड्या: ओह्ह्ह्...(निःश्वास सोडत) ऑफिसच्या कामाचं प्रेशर होय... ते म्हणतोयस का तु???
(बंड्याला का कोण जाणे, उगीच हायसं वाटलं.)
मी: हो, मग काय? डेडलाईन जवळ आलीये. प्रोजेक्ट्स संपवायचेत. तुला काय वाटलं??? कोणत्या प्रेशरबद्दल बोलतोय मी???
बंड्या: मला वाटलं की...
(असं म्हणत बंड्यानं पोटावरुन हात फिरवला. त्यानं प्रेशरचा काय अर्थ घेतला ते लक्षात आल्यावर मी कप्पाळावर हात मारुन घेतला.)

आपला,
(अंडरप्रेशर) सौरभ

SDLC (सॉफ्टवेअर डेव्हलोपर्स लाईफ साईकल)

6 प्रतिक्रिया
कोण म्हणूनी पुसता मजसी, मी एक इंजिनिअर आहे,
मनुष्यांपेक्षा ज्याचे जिवन, यंत्रसानिध्यात गेले आहे...

कोडिंग करण्यात घालवले मी, तास अनेक अनेक,
दिवस रात्रीचे घड्याळ माझे, कधिच बिघडून गेले आहे...

दिवस अन् रात्रीतला फरक, वेळेला माझ्या कधी गमला नाही,
डेडलाईनचे घड्याळ मात्र, काटेकोरपणे अगदी पाळले आहे...

प्रोग्रॅम माझा प्रगत, करे वेळेची बचत,
बचत करण्यात ही, सारे आयुष्य खर्चिले आहे...

सगळेच कसे सोपे केले, बटण दाबताच कामे होती,
बटण दाबण्यासही कष्ट व्हावे, मनुष्य इतका आळशी आहे...

सोशल साईट्सच्या माध्यमातून, जगास मी जवळ आणतो,
पण स्वतःच्या नातेबंधांचा, विसर मज आज पडला आहे...

मोठ्या कंपनीत उच्च पदावर, लठ्ठ पगार कमावितो मी,
पैसा खर्च करण्यासाठी, बाजार सुखांचा शोधतो आहे...

आपला,
(काव्यवेअर इंजिनिअर) सौरभ