मराठी भाषा दिन

चित्रसौजन्य: मोगरा फुलला
२७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी



आमुच्या मनामानात दंगते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
                                                                                            कवि: श्री. सुरेश भट

कबुली: सांगताना लाज वाटते, पण खरं आहे; आज पहिल्यांदाच मी "मराठी भाषा दिन" म्हणून शुभेच्छा देतो आहे. किंबहुना २७ फेब्रुवारी हा "मराठी भाषा दिन" म्हणून साजरी होतो(?) हे सर्वार्थाने कळते आहे.
का व्हावं असं? अचानक असा गहिवर का यावा? एवढं प्रेम अचानक का जागृत व्हावं? सध्या मराठी मराठी म्हणून जे काही चाल्लय म्हणून? राज ठाकरेंच्या भाषणाचा प्रभाव म्हणून? का कौशल इनामदारांच्या "मराठी अस्मिता" चळवळीचा परिणाम? कि परदेशात राहतोय म्हणून? अनेक प्रश्न. प्रत्येकात थोडं थोडं उत्तर लपलय. तसं म्हणायच तर खरी सुरुवात झाली ते घरापासून लांब रहावं लागलं तेव्हा. मी ठाणेकर. So called "METRO" शहरात अनेक भाषिक जनतेशी आपण संपर्कात येतो. त्याच्या भाषेत व्यवहार करतो. कधी वाटलं नाही मराठी धोक्यात आहे. उलट जे "मराठी वाचवा, जगवा" अश्या घोषणा द्यायचे त्यांची किव वाटायची. पण २००१ मधे जेव्हा बी.ई.साठी बेळगावच्या कॉलेजमधे यावं लागलं तेव्हापासून स्वतःला उगीच उदारमतवादी समजणारा मी हळूहळू भाषेच्या बाबतीत कडवा व्हायला लागलो. बी.ई.च्या शेवटच्या वर्षासाठी मला बंगळूरुला स्थलांतरीत व्हायला लागलं. आणि तिकडे गेल्यावर मी मराठीच्या बाबतीत जास्तच आग्रही (कट्टर म्हणू शकता) झालो. विचार करतो तेव्हा मला एक कारण मिळतं. बेळगाव, म्हटले तर तिकडे मराठी भाषिक भरपुर, पण कर्नाटक राज्याच्या अधिकार क्षेत्रात असल्याने कानडी. ठीक आहे. अरे पण तुम्ही दुसरा कोणी मराठी/हिंदी बोलतो म्हणून असं तोडुन टाकल्यासारख काय वागता? असो. हद्दीवरचा प्रांत, त्यात राजकीय धसमुसळेपणा (महाराष्ट्र एकीकरण समिती विरुद्ध कानडी भाषिक), मान्य. त्यांचा प्रभाव आणि त्या प्रभावाखाली वावरणारी तिकडची जनता.
बंगळूरु, कर्नाटकाची राजधानी. भारताची सिलिकॉन व्हॅली. जेव्हा इकडे आलो तेव्हा वाटलं इकडे बेळगावपेक्षा परिस्थिती चांगली असेल. कानडी भाषिक जनता असली तरी "मेट्रो सिटी"मधे असल्याने जास्त नाही पण थोडीतरी व्यापक दृष्टीकोन असलेली असतिल. पण आलेला अनुभव अगदी विरुद्ध. पहिल्यापेक्षा वाईट. तुम्ही हिंदीमधून संवाद साधलात तर तुम्ही परग्रहावरचे. प्रतिक्रिया म्हणून मख्ख चेहरा, जणू काही मी मुकबधिर आहे, तुम्ही जे काही बोलताय ते मला समजत नाही. किंवा तुम्ही अतिशय तुच्छ, क्षुद्र व्यक्ती आहात, समोरुन चालते व्हा, इकडे आलात कशाला असे अविर्भाव.
अरे जेव्हा तुम्ही (परप्रांतिय)महाराष्ट्रात येता तेव्हा तुम्हाला कधी अशी वागणूक दिली का रे??? लहानसहान छोटीमोठी खेडी सोडा, जिकडे शिक्षणाचा बोजवारा उडालेला असतो. पण महाराष्ट्रात कधी मराठी माणसाने अशी तुसडेपणाची वागणूक दिली नाही.
जेव्हा स्वतःच्या घरी तुम्ही पाहुण्याचा यथासांग पाहुणचार करता, योग्य आदरातिथ्य करता; तेव्हा तुमच्या मनात एक अपेक्षा असते की आपण ज्यावेळी त्यांच्या घरी जाऊ त्यावेळी ते विचारपुस तरी करतिल. पण कसलं काय!!! दरवाज्याजवळच कोण तू? काय हवय? चल हाड्ड... अशी हेटाळणी व्हावी!!! 
मग तुम्हाला काय वाटलं, पुढल्यावेळी मी तुम्हाला माझ्या घराच्या आसपासदेखिल फिरकू देईन??? नतद्रष्टांनो... तुमच्या घरी तुम्ही माज दाखवणार आणि माझ्या घरी मी तुमची उठबस करावी अशी अपेक्षातरी कशी ठेवता रे??? मराठी भाषिकांना कमी, संकुचित लेखणाऱ्या कर्मदरिद्र्यांनो लोण्यासारख्या काळ्या मातीच्या ढेकळाप्रमाणे मऊ आमचं हॄदय असलं तरी प्रसंगी काळ्या कातळाइतकं कठीण आणि सह्याद्रीसारख रांगडं आहे. याद राखा.
बाहेरच्या जगात आलेले अनुभव वाईट असले तरी त्यातून एक परिणाम चांगला साधला गेला. नाती अधिक दृढ झाली. जन्माला आल्यावर आपल्याला एक नव्हे तर पाच माता लाभतात. पहिली जन्मदात्री, दुसरी आपले पालनपोषण करणारी, तिसरी आपल्याला शिकवणारी, चौथी जन्मभूमी मातृभूमी, आणि पाचवी मातृभाषा... दैव थोर म्हणून महाराष्ट्र मातृभूमी आणि मराठी मातृभाषा लाभली.

थोरवी तुझी कथु नं शकतो मी
मुक्यानेच तुजला भाव अर्पितो मी


आपला,
(मराठी) सौरभ

7 प्रतिक्रिया:

आनंद पत्रे said...

सौरभ,
प्रत्येक वाक्याशी सहमत...

सौरभ said...

आनंद, सांगण्यासारख अजुन खुप काही आहे. पण सगळंच इकडे मांडू शकत नाही. माझ्या परिने जेवढे शक्य होते ते करतो.

रोहन... said...

वा सौरभ... शुभेच्छा देताना इतका चाबुक आणि सडेतोड लेख माझ्या वाचण्यातून आजवर राहिला ह्याचा खेद आहे. तू खरे बोलतो आहेस. ज्या महाराष्ट्राने ह्यांना भरभरून दिले आज तिचेच हे दिवस बघावे लगत आहेत.

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी... आपुल्या घरात हाल सोसते मराठी... हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी... शेवटी मदांध तख्त फोडते मराठी... शेवटी हेच खरे.. आणि आता ती वेळ आलेली आहे...

मला सार्थ अभिमान आहे की मी या महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या कुशीत शिवरायांचा एक मावळा म्हणून जन्माला आलो...

(सौरभ मी सुद्धा ठाणेकर आहे बरं का..)

सौरभ said...

अरे व्वाह. ठाण्याला कुठे? मी ठाणेकर म्हणजे अगदी ठाण्यातच घर आहे असं नाही. कळव्याला राहतो मी. :)

रोहन... said...

अरे... मी पाचपाखाडीला राहतो (सध्या कामानिमित्त जगभ्रमंतीवर आहे) आणि माझ्या बायकोचे घर कळव्याला आहे.. आणि कळवा म्हणजे ठाणेच की... :)

सौरभ said...

GR8, मी upstate New Yorkमधे आहे सध्या. भारतात येणं झालं तर भेटायला नक्कीच आवडेल. :)

रोहन... said...

अरे नक्कीच.. तू जेंव्हा भारतात येशील तेंव्हा मी तिकडे असीन तर नक्की भेटू... तसेही अनेक ब्लोग्गर्सना भेटायचे प्लान्स सुरु आहेत सध्या. :D बघुया कसे आणि कधी जमते... आणि हो समोरा-समोर भेटू तेंव्हा भेटू पण आत्ता तुला फेसबुक, ट्विटर आणि ओर्कुटवर गाठतो रे ................

Post a Comment