पुन्हा एकदा आयुष्यात एक long weekend, प्रोफ.ला पण सुट्टी मिळाली. कुठे जायचं अजून काही ठरलं नाही. इतकंच ठरलं होतं की कोकण रेल्वेची सफर करायची. मग दादर-सावंतवाडी पकडली खरी, पण कुठे चाल्लोय हे माहित नाही, अन् पुढे काय वाढलाय ह्याची तर अजिबातच कल्पना नव्हती. तिकीट काढायच्या रांगेतच गर्दीचा अंदाज आला, पण आम्ही जिद्द हरलो नाही.
००:४५ची ट्रेन होती, एखादा जलदुर्ग बघून परत फिरू असा बेत आखला. ट्रेनमधे सीट मिळवण्यासाठी चांगला लढा दिल्यावर बसायचा अनुभव घेता आला! आता मागून येणारे हळूहळू adjust होऊ लागले. कोणी समान ठेवायच्या फळीवर, तर कोणी दोन berthच्या मधल्या जागेत. हे तर काहीच नाही, २ toiletsपैकी एका toiletमध्येपण एखाददोनजण accommodate झाले होते. ट्रेन स्टेशन मधून निघेपर्यंत आजूबाजूला इतकी माणसं गोळा झाली होती, कि अगदी heavy rush असलेली लोकलपण लाजेल. वरच्या berthवर बसलेल्यांच्या पायांची अशी काही जाळी विणली गेली होती कि खाली उजेड यायची संभावना संपली. तासाभरानी शरीराला पाय असतात ह्याचा आम्हाला विसर पडला. पायाला "ping" पाठवल्यास तिसऱ्याच्याच पायाचा reply यायचा. मग सालं ketamineचा एक डोस घेऊन निवांत झोपी जावं. त्यात पण नशिबाची गरिबी म्हणजे ट्रेन पेणजवळ सिग्नलवर २-२:३० तास थांबून होती. पाहटे उठून बघितलं तर रोह आलं होतं. म्हणजे रात्रभर आपण फक्त १००-१५० किलोमीटर काटले होते? आता ह्या बधीर अवस्थेत आणखीन प्रवास झेपला नसता. ट्रेन सोडून, पुढे ट्रकमधून जायचा प्लान आखला. तितक्यात प्रोफ. म्हंटला म्हणून पुढचे डब्बे तपासून आलो. एका डब्यात जागा मिळाली. चला टांग बच्ची तो लाखो पाये!
सिंधुदुर्ग स्टेशन येई पर्यंत दुपारचा ०१:०० वाजला होता. ढगांच्या दाटीमागून सूर्यकिरणं डोकं काढीत होते. आता पाय मनसोक्त मोकळे करून घेतले, चालतांना आपले पाय अजूनपण हलतात ह्याचा आनंद होताच. बस स्थानकाच्या जवळच एका घरगुती खानावळीत बढीया बांगडा थाळीवर हात मारला. प्रोफ.ने कोंबडी नसल्या कारणाने शाकाहारी आहार पसंत केला. जेवण चविष्ट होतं आणि बांगडा ताजा! पुढे होऊन मालवणला जाणारी बस पकडून सिंधुदुर्ग बघायचा आणि सूर्यास्ताचे फोटो काढायचा विचार होता. तसं बघता आजकाल दुर्ग आणि गडांवर बघण्यासारखं काही उरलं नाहीये. तुमच्या जवळपास कुठे ताक, लिंबू सरबत, शीत पेय मिळत नसतील तर मग नक्की जावा! (काही गड अजूनही अपवाद म्हणून आपण ठेऊ...... तरीपण घुमवून फिरवून मला निषेध नोंदवायचा होता.) वाटेत होडीमधे एक छान portrait मिळालं. सिंधुदुर्गावर तसे काही चांगले फोटो पदरी पडले.
आम्ही आता मालवण स्थानकावर पोहचेपर्यंत कणकवलीला जाणारी शेवटची बस निघून गेली होती, आता कसालला जाऊन, तिथून कणकवलीची बस पकडणे हा एक पर्याय होता. आम्ही तो आजमावला. अंगावरचा घाम अन् धुळीचा लेप थोडा धुऊन काढला. अन् पौर्णिमेच्या प्रकाशात मिणमिणतं कोकण पाहत होतो. चांदण्या आणि चंद्र ह्याशिवाय एकही उजेडाचा स्त्रोत नसलेल्या highwayची मजाच और आहे. आजूबाजूच्या झाडीचा तो गोड गंध आणि पानांची सळसळ.
कणकवली बस स्थानकापासून मुंबई-गोवा महामार्ग जवळच होता. महामार्गाच्याच एका टपरीवर उसळ-पाव जेवलो. आता इथून ट्रकला लिफ्ट मागून मुंबईला पोहचायचा विचार होता. पण ह्या अखंड प्रवासात आमचं नशिब कुठेच साथ देत नव्हतं. मग बस स्थानकावर ११:४५ची पुण्याची बस पकडायचा प्रयत्न केला, आत घुसणं मुष्किल होतं. एखादी ट्रेन पकडू म्हणून रेल्वे स्टेशनची वाट धरली. एका ठिकाणी रेल्वे स्टेशनचा पत्ता विचारायला एकाला हात दाखवला, तर तो तिथून आम्हाला नं बघतच सटकला. कमाल आहे, आम्ही कोकणात ह्या महामार्गावरचे भूत वाटत असू त्यांना! एका ठिकाणी ATM दिसलं. पण त्या इमारतीच्या मुख्य दरवाज्यालाच कुलूप होतं! काय भारी गाव आहे हे!! त्या स्टेशन वर पहाटे ०५:४५ पर्यंत ट्रेन थांबणार नव्हती. आता फलाटावर पुठ्याची गादी बनवून आडवं पडून स्वतःशीच म्हंटलं, "उद्याच्या ट्रेनमध्ये इतकी गर्दी असेल कि सालं आपल्याला उभं राहायलापण जागा नाही मिळणार." Murphy's Lawप्रमाणे जे होऊ नये असं वाटतं, तेच होईल अशी अशा करा. पण आमच्या कुत्रं झालेल्या नाशिबासमोर Murphy's Law ने पण हात टेकले.
ट्रेनमध्ये चढलो तर सही, पण सालं उभं राहायचा कांटाळा आला होता. ६ इंच सीट बघून मग तिकडे टेकलो, आणि निर्लज्ज होऊन एकेकाला ढकलून निवांत जागा बनवून घेतली. मग ती जागा एका म्हाताऱ्या बाबाला दिल्यावर मात्र आम्ही दारात पसरून बसलो. पनवेल वरून पुण्याची बस पकडली. बसायला जागा नव्हती, पण तरी आम्ही दोघांनी जिन्यात बसायचे खयाली पुलाव रंगवले! पनवेल सोडलं नसेल तर मागे उभ्या बाईला बसचा त्रास होऊ लागला. त्यात त्यांनी जिन्यात उलट्या केल्या...... वाह रे मेरे नसीब!! काय सुरेख आसन होतं, बरबटलं बिचारं.
काही म्हणा, हा पण एक नविनच अनुभव होता! Patience तर भारीच वाढला आणि सगळेच प्रवास सुखाचे नसतात हा बोध घेतला! केरळ ट्रिपला आपल्याकडे सगळेच हुकुमी पत्ते होते, ह्या वेळी जरा अवघड डाव होता. पण कोकण रेल्वेबद्दल जे निसर्गरम्य वर्णन ऐकून होतो, ते सगळे धुळीत गेले. रुळांच्या बाजूने प्लास्टिकची रांगोळी सर्वत्रच होती. ह्यापेक्षा केरळ मधला कुठलाही random रूट १०० टक्के निसर्गरम्य ठरेल.
असो घरी येऊन व्हिस्कीचा घोट घेत पुढच्या वेळी कुठे जायचं हा प्रश्न कायमच होता. :)
आपला,
(दमलेला) माचाफुको
1 प्रतिक्रिया:
मित्रा, काय फोटो आहेत. मस्तच. ते पोर्ट्रेट मला ओरिजिनल पाठव ना... पाहतो काही PP करता आलं तर.
Post a Comment