एका रुपयाची गोष्ट

गुंड्याः बंड्या तु चहा घेणार का?

बंड्याः चालल..

गुंड्याः अण्णा दोन कटींग दे...
...
...

काय रे?? कसला विचार करतोय्स??

बंड्या: विश्वा करतो चिंताची...

गुंड्या: क्काय???

बंड्या: अरे काय नायरे... चिंता करतो विश्वाची असं म्हणायचं होतं.. सोड ना...

गुंड्या: सकाळी सकाळी मनाचे श्लोक ऐकलेस की ऐकवलेत कोणी?? बोल की...

बंड्या: तसं नाय रे.. उगीच... एक गोष्ट आठवली... कुठंतरी वाचली होती.

गुंड्या: कसली?

बंड्या: एक रुपयाची...

गुंड्या: एक रुपयाची!!! मलापण सांग ना... हां पण एक मिनिट... शॉर्टमधे सांग. चहाच्या दोन घोटात संपव. उगीच डोक्याची तंदूर नको करुस..

बंड्या: च्यायला... हलकट साल्या.. बरं ऐक. एक ना खुप श्रीमंत माणूस असतो. त्याला एक मुलगा असतो. वाया गेलेला, आळशी, कामचुकार. पैश्याची काही किंमत नसते त्याला. मित्रांमधे उडव, मजा मार, कुठे ना कुठेतरी उधळपट्टी चालूच असते. सेविंगचा कन्सेप्टच माहित नसतो त्याला. त्यामुळे त्याचा बाप एकदम टेन्शनमधे असतो. कसं होणार ह्याचं, कधी कळणार पैश्याचं महत्व ह्याला... ते त्याला समजावून समजावून थकले पण बेटा काय सुधरेना.. मग त्याला एक नामी युक्ती सुचते. तो त्याच्या पोराला म्हणतो बेटा... मी आता तुला फक्त तुझ्या गरजेसाठी आवश्यक असतिल तेवढेच पैसे देणार. बाकी तुझ्या खर्चाचे तु स्वतः कमवायचेस. आणि हो... उद्यापासून तु रोज संध्याकाळी जेवणापुर्वी एक काम करायचस. जे काही पैसे तुझ्याकडे असतिल, त्यातला एक रुपया तु माझ्या समोर आपल्या परसातल्या विहीरीत टाकायचास. ज्या दिवशी टाकायला चुकशील त्या दिवशी जेवण नाही मिळणार. बेटा म्हणतो, धत्तिच्या, एकच रुपया टाकायचाय ना. हरकत नाय. उपाशी रहायची वेळ येणारच नाही. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासुन बेटाजीचा उपक्रम चालू झाला. जो काही खर्चाला मिळत असलेल्या थोड्याफार पैश्यातला एक रुपया बाजूला काढायचा आणि जेवणापुर्वी वडिलांच्या उपस्थितीत विहीरीत टाकायला लागला. आगोदरचे काही दिवस असं केल्यावर नंतर त्याला असा एक एक रुपया बाजूला काढून ठेवायचा कंटाळा यायला लागला आणि त्याने ते थांबवलं. हा दिवसभर बाहेर हुंदडायचा आणि संध्याकाळी परत यायचा तेव्हा खिसा रिकामा. पण रुपया टाकल्याशिवाय बाप जेवायला देणार नाही हे माहित असल्याने मग आईकडून एक रुपया मागून घ्यायचा आणि विहीरीत टाकायचा. काही दिवस त्याची आईपण त्याला काही बोलली नाही. पण रोजचंच झाल्यावर तिने त्याला रुपया देणं थांबवलं. ह्याला त्याचं काही वाटलं नाही. पठ्ठ्या मित्रांकडून रोज एक रुपया घेऊ लागला. मित्र सुरुवातीला हसून रुपया द्यायचे. पण नंतर नंतर तेपण वैतागले. एकतर त्याला मिळणारे पैसे कमी, त्यामुळे त्याच्याकडुन होणार खर्च कमी, वर रोज एक रुपया द्या.. मित्र त्याले टाळू लागले. अन् एके दिव्शी त्यो दिस आलाच.. त्याकडं विहीरीत टाकायला रुपडाच न्हव्हता. झालं... बापानं म्हटल्याप्रमानं ठेवलं त्याले उपाशी. पोरगंबी झोपलं गुमान उपाशीपोटी. दुसऱ्या दिव्शीबी त्येच. तिसऱ्या दिवशी पोरगं आलं रडकुंडीला. पर बाप काय भीक घालंना. पोरगं पडलं तणतणत घराबाहेर. फुकटात कोनी रुपया देईना तेव्हा मजुरी करुन एक रुपाया कमावला आणि संध्याकाळी आणला बापासमोर. गेले दोगं विहीरीपाशी. बाप बोल्ला टाक ते नाणं विहीरीत... पोरानं ते नाणं मुठीत अजुनच आवळलं आणि वरडला... न्हाय टाकनार... मेहनत करुन कमावलाय मी त्यो. असाच कसा टाकू. तसा बाप बोल्ला. बेट्टाजी आज तुला मेहनतीनं कमावलेला एक रुपया सोडवेना आणि माझे मेहनतीचे पैसे रोज उधळायचास तेव्हा काय वाटलं नाय. रोज जे नाण टाकायचास तेबी तुझ्या मेहनतीचं न्हवतं म्हणुन टाकायला कायबी वाटत नव्हतं. पन आजचा तुझ्या हाततला रुपया तुज्या सच्च्या मेहनतीचा हाये. नको टाकूस. ठेव तुज्याकडं. तुला पैश्याचं महत्व कळावं म्हणुनच मी हे समदं केलं. पोरगं शाणं होतं. काय ते कळून चुकलं. बापाची माफी मागितली आणि पैसा व्यवस्थित सांभाळू लागला.

गुंड्या: अच्छा... ओके... हम्म्म.. पण अचानक का आठवली तुला ही गोष्ट???

बंड्या: अरे, मी आईबरोबर बाजारात जायचो ना. ती घेऊन जायची मला पिशव्या उचलायला आणि बाजारभाव कसा करावा ते कळावं म्हून. लई वैताग याय्चा राव. एक रुपयासाठी घासाघिस करायची. मी तिले बोलायचे कशाला करतेस एका रुपयासाठी तंटा. दे की सोडून. एका रुपड्यात काय ती भाजीवाली महाल बांधणारे की तु श्रिमंत होणारे?? ती चिडायची. तुला काय समजत नाय म्हणुन मलाच गप्प करायची.

गुंड्या: बरं मग???

बंड्या: परवा आफिसात जाताना म्हटलं वेफर्स घेऊ. कायतरी आपलं तोंडात टाकायला असलं की बरं असतं. मी घेतले आपले पाव किलो. ४५ रुप्ये झाले. मी १०च्या ४ नोटा आणि चिल्लर संपवायचे म्हून २ची ३ नाणी असे ४६ रुप्ये दिले. काकांनी वेफर्स दिले बांधून आणि लागले दुसऱ्यांच्या पुड्या बांधायला. मला वाटलं देतिल सुटा एक रुपया परत. मी थोडावेळ थांबून म्हटलं, काका मी पुरे ६ रुप्ये दिलाव. एक रुपाया परत करा. त्यांच्या ध्यानात नव्हतं आलं मी ६ रुप्ये दिलेत ते. त्यांना वाटलं मी सुटे ५च रुप्ये दिलेत. अच्छा असं का म्हून हसले आणि दिला एक रुपाया परत. लई येगळाच लखलखला रं तो रुपाया.

गुंड्या: बरं मग??? पुढे...

बंड्या: फुडे???!!! फुडे काय फुडे??!!! काय तुला किर्तन ऐकवून रायलो की रामायण महाभारतातल्या गोष्टी?? त्या सांगून संपल्यावरपण विचारशील फुडे??? तुला इतकावेळ काय सांगितलं ते काय झेपलं की नाय???

गुंड्या: (कान खाजवत) बंड्या... तु नोकरीला लागल्यापासून जाम बोर झालाय्स. काय बोलतोय्स मला काही समजत नाहीये.

बंड्या: (कपाळावर हात मारुन घेत..) हाय का... म्हन्जे गाढवासमोर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता म्हनाय्ची वेळ आणलिस माज्यावर...

गुंड्या: गप रे.. कसल्या म्हणी ऐकवतोय्स... आणि हे असं गावरान भाषेत का बोलतोय्स???

बंड्या: (नंदीबैलासारखं डोकं डुलवित) काय नाय असंच... गेले दोन दिवस मकरंद अनासपुरेचे चित्रपट बघुन रायलो त्येचाच पारिणाम असावा...

गुंड्या: (वैतागुन) चल निघायचं का??

बंड्या: निघू...

गुंड्या: अण्णा किती झाले...

अण्णा: दोन कटींग... ४ रुपये...

गुंड्या: हे घ्या..

(गुंड्याने अण्णाच्या हातावर ५ रुपये टेकवले आणि परत दिलेला १ रुपया नं घेताच निघाला. तसा...)

बंड्या: अरे, १ रुपया घे की परत...

गुंड्या: !!! अरे.. चल... वेडा का??? हॉटेलात जातोस ना??? टिप दिलिये ती.. चल...

(बाजुने तिन आणि वर एक असे चार पत्रे टाकून हॉटेल होतं ह्याचं नसेल वाटलं त्याहून जास्त गुंड्याच्या वागण्याचं नवल बंड्याला वाटलं. आणि आपण काय बोलत होतो ते गुंड्याला खरंच काहीच समजलं नाही हेपण कळालं.)

बंड्या: लेका... टिप द्यायला तु कधीपासून कमवायला लागला रे???

गुंड्या: बंड्या, साल्या काय पकवतोय्स... चल... रद्दी आपली हक्काची कमाई आहे. कालच विकलीये. २०० रुपये मिळालेत.

अस्सं म्हणुन बंड्यानं त्या रुपयाकडे एकवार नजर टाकली. तो पुन्हा तसाच लख्खकन चमकला. बंड्या हसला... आणि त्याला पाठमोरा होऊन चालायला लागला....

आपला,
(एक रुपयाधिश) सौरभ

2 प्रतिक्रिया:

Unknown said...

Sourabh !!

Chaan aahe lekh awadlaa.. mazhya account laaa 5-6 hazaar balance zalaa tari mazhaa jiv khalivar hoto ...aani kahi janachaa pagar tevdhach asto tari te tyatahi khush astaat..

asech kiti tari lakhhakan chakaknare ek Re che naane sodun dile aahet.. ataa sodaychi himmat hot nahi karan ....Kashtache aahet naa..

सौरभ said...

@विजय, प्रतिक्रियेबद्दल आभार रे. warm welcome on the blog. :) स्वतःच्या कष्टाची कमाई असल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचं मूल्य समजत नाही. बडी बात, आता समजायला लागलं आहे. :D

Post a Comment