Tags

6 प्रतिक्रिया
1.Where is your cell phone?
why do u want my cell... i don't hv much balance left... use ur own...

2.Your hair?
ohh!!! thank god!!! they still exists as strong as before...

हिशोब... काहीच्या काही...

11 प्रतिक्रिया
बसलेलो मी एकदा असाच, एका निवांत क्षणी
जमवून आठवणी, मनात काही अन् डोळ्यात काही...

मांडला हिशोब सगळा, जगलेल्या पुर्ण आयुष्याचा
प्रत्येक त्या क्षणाचा, हसलेलो काही अन् रडलेलो काही...

जमाबाकीच्या ताळेबंदात, स्तंभ दोन पडले
क्षण मी विभागले, सुखांचे काही अन् दुःखांचे काही...

झाली गणिते सगळी, मोजणीस ना काही उरले अन्य
शेवटी बाकी शुन्य, ना गमावले काही ना कमावले काही...

आपला,
(रिक्त) सौरभ

भिजा... सौख्य भरे...

8 प्रतिक्रिया
"पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत; तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका... हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत... (किंवा आले तरी ते तुम्हाला अनुभवता आले नाहीत...)"

समुद्रकिनारी भटकत असताना अचानक एखद्या शिंपल्यात मोती सापडावा तसेच अगदी सहजच आंतरजालावर सफर करताना काही शब्द, वाक्य, कविता, गझला, गाणी, लेख अशी सापडतात जी झटक्यात मनाची पकड घेतात आणि त्यांचा ठसा सोडून जातात. मिपावर (मिसळपाव.कॉम) हे वाक्य एका सदस्याने टाकले होते. लई भावलं आपल्याला. नक्की लेखक कोण ते माहीत नाही. (कंसातला भाग सोडून... ते वाक्य मी घुसडवलय.)
आपल्या आयुष्यात असे ओलावा देणारे असंख्य क्षण येत असतात. का कोण जाणो आपण एवढे रुक्ष असतो की ते आपल्याला टिपता येत नाहीत. एवढे कोरडे नका राहू. दुभंगाल. प्रत्येक क्षण जगा. (चांगला/वाईट कसाही असला तरी) अनुभवा. भावनेचा ओलावा असू द्या. सुखासमाधानाची हिरवळ पसरु द्या. प्रेमाचा मृद्गंध दरवळू द्या. आनंदाचे इंद्रधनुष्य उमटू द्या... :)

आपला,
(भिजलेला) सौरभ

जखमा कश्या सुगंधी...

8 प्रतिक्रिया


जखमा कश्या सुगंधी झाल्यात काळजाला,
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा...

गझलकार - इलाही जमादार
संगीतकार/गायक - भीमराव पांचाळे


कसे सुचले असतील हे शब्द. किती काय सांगून जातात हे शब्द. आणि कोण म्हणतं की सगळ्याच भावना शब्दांत सांगता येत नाहीत. कदाचित त्या व्यक्त करायला आपणच असमर्थ असतो. गझलकार श्री. इलाही जमादार यांनी ह्या गझलेत निवडक, चोख आणि अचूक शब्दांत अनेकअनेक भाव ठासून भरलेत. श्री. भीमराव पांचाळे ह्यांच्या आवाजाची जादू आपल्याला एका वेगळ्याच भावविश्वात गुंगवून टाकते. आणखी काय सांगू, तुम्हीच समजून घ्या.
ह्या दोन्ही कलाकारांना माझा मानाचा मुजरा...

आपला,
(भावगुंग) सौरभ

दिनचर्या

8 प्रतिक्रिया
पहाटेचा रामप्रहर, वाजे घड्याळी गजर| झोपेचं खोबरं, होतसे||
पेंगुळलेले डोळे, जड त्या पापण्या| स्वप्नांचा चक्काचूर, पहातसे||
दमदार जांभई, अन् आळस घेऊन| गजराचे घड्याळ, पुन्हा स्नूझमधे||
उषःकाल सरुन, मध्यान्ह जाहली| निद्राभंग झाला, गरमीने||
आढेवेढे घेत, पांघरुण सारले| उठावे लागले, नाईलाजे||
प्रातःर्विधी कारणे, न्हाणीघराकडे कूच| नेमक्यावेळी ते, व्यस्त असे||
तोवरी आदण चहाचे, ठेवावे गॅसवर| दिवसाची सुरुवात, अमृताने||
दंतमंजन लेप, घ्यावा ब्रशवरी| लेपून तोंडभरी, मौजे घासावे||
खळाखळ भरुन चूळ, मुखमार्जन पात्री| चेहरा धुवावा, साबणाने||
शुचिर्भुत होवून, प्रसन्न व्हावे| दिनक्रम आपुला, आरंभावा||
चहा वाफाळता, घ्यावा गाळून| सोबती रवंथ, बिस्किटांचे||
बैठक घ्यावी, लॅपटॉपसमोर| साईट विहार, प्रारंभावा||
ना स्क्रॅप कोणाचे, ना एकही ईमेल| तरी पेज रिफ्रेश, करित रहावे||
घटीका सरतील, निष्क्रिय अश्याच| गर्भी उद्रेक, वायुचे||
सारुन बैठक, घ्यावी विश्रांती| निमित्त करावे, न्याहारीचे||
शमवूनी भुक, वामकुक्षी घ्यावी| बागडावे आनंदे, संध्याकाळी||
रात्र होता परतावे, आपुल्या घरी| व्यवस्था करावी, भोजनाची||
आपलेच हात, अन् आपलेच पोट| जाणोनी करावा, स्वयंपाक||
चलचित्र पहाता, उदरभरण करावे| तृप्त व्हावे करुन, हे यज्ञकर्म||
पांघरुण पसरुन, द्यावी ताणून| निद्रिस्त व्हावे, शांतचित्ते||
स्वप्नांचा खेळ, खेळत झोपावे| असा न्यावा दिवस, पुर्णत्वे||
दिनचर्या अशीच, थोड्याफार फरकाने| होतसे रोज त्यात, नाविन्य नसे||
सौरभ म्हणे ज्याने, कंठीले आयुष्य ऐसे| आदर्श बेरोजगार म्हणूनी, गौरवावे||


आपला,
(संत) सौरभ

सोनाली कुलकर्णी

5 प्रतिक्रिया

(All pictures removed... Dedicated a blog for her... visit the blog सो.कु. will get updated soon)

सौंदर्याने पृथ्विवर पहिल्यांदा जन्म घेतला तो मधुबालाच्या रुपात, नंतर माधुरी दिक्षितच्या रुपात आणि आता त्याची नविन आवृत्ती आलिये ती सोनाली कुलकर्णीच्या रुपात...

(ह्या पोस्टला काय नाव द्यावे हे मला बिलकूल सुचत नव्हतं. मदनिका, सौंदर्याची खाण, कट्याराप्रमाणे काळजात रुतलेली नार, काय काय विचारांचे पतंग उडवले... शेवटी तिचंच नाव देऊन टाकलं.)


आपला,
(वेडापिसा) सौरभ

२६/११/२००८

1 प्रतिक्रिया

२६/११/२००८ ला झालेल्या मुंबईवरील हल्ल्यातील सर्व हुतात्म्यांना भावपुर्ण श्रद्धांजली आणि मानवंदना

आपला,
(नतमस्तक) सौरभ

प्रेशर

2 प्रतिक्रिया
(मला जरा वैतागून बसलेलं पाहून बंड्यानं माझ्या पाठीवर थाप देत विचारलं...)
काय रे, काय झालं? तब्ब्येत ठीक नाहीये का?
मी: काय सांगू बंड्या, आजकाल ऑफिसमधे पाय ठेवला रे ठेवला की प्रेशर जाणवतं.
बंड्या: काय बोलतो???!!!
मी: अरे नाहीतर काय. अगदी संध्याकाळी उशीरा ऑफिसमधून निघेपर्यंत प्रेशर असतं.
ऑ!!! पण तु दिवसभर प्रेशर सहन करत ऑफिसमधे कसा काय रे बसू शकतोस??? (बंड्याने निरागसपणे विचारलं.)
मी: काय करणार? (उसासा टाकत...) नाईलाज आहे... बसावं लागतं.
(दोन्ही हात वर करुन, ताणत मी मस्तपैक आळस दिला.)
अगदीच अस्वस्थ झालं तर सरळ ब्रेक घेतो. फ्रेश होऊन आलं की पुन्हा काम चालू.
त्यापेक्षा मग घरी का नाही आवरत तु??? (बंड्याचा प्रेमळ सल्ला.)
मी: छ्यॅ छ्यॅ (म्हणून मी बंड्याला उडवून लावलं)... मी ऑफिसमधेच सगळं उरकतो आणि मग येतो.
ऑफिसमधेच??? (गडबडलेल्या बंड्याची मान कावळ्यासारखी तिरकी झालेली.)
मी: ही ऑफिसची कामं ऑफिसमधेच करायची. उगीच घरी कशाला त्याचा व्याप.
ऑफिसची कामं!!!??? आणि ही अशी???!!! (बंड्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य, गोंधळ, प्रश्न, अविश्वास आणि ईईई शी बाबा अश्या टाईपचे सगळे भाव एकवटून आलेले.)
मी: मग काय... असतात एक एक कामं. ऑफिसच्या कामांचं प्रेशर काय असतं हे तु ऑफिसला जायला लागशील तेव्हाच समजेल.
बंड्या: ओह्ह्ह्...(निःश्वास सोडत) ऑफिसच्या कामाचं प्रेशर होय... ते म्हणतोयस का तु???
(बंड्याला का कोण जाणे, उगीच हायसं वाटलं.)
मी: हो, मग काय? डेडलाईन जवळ आलीये. प्रोजेक्ट्स संपवायचेत. तुला काय वाटलं??? कोणत्या प्रेशरबद्दल बोलतोय मी???
बंड्या: मला वाटलं की...
(असं म्हणत बंड्यानं पोटावरुन हात फिरवला. त्यानं प्रेशरचा काय अर्थ घेतला ते लक्षात आल्यावर मी कप्पाळावर हात मारुन घेतला.)

आपला,
(अंडरप्रेशर) सौरभ

SDLC (सॉफ्टवेअर डेव्हलोपर्स लाईफ साईकल)

6 प्रतिक्रिया
कोण म्हणूनी पुसता मजसी, मी एक इंजिनिअर आहे,
मनुष्यांपेक्षा ज्याचे जिवन, यंत्रसानिध्यात गेले आहे...

कोडिंग करण्यात घालवले मी, तास अनेक अनेक,
दिवस रात्रीचे घड्याळ माझे, कधिच बिघडून गेले आहे...

दिवस अन् रात्रीतला फरक, वेळेला माझ्या कधी गमला नाही,
डेडलाईनचे घड्याळ मात्र, काटेकोरपणे अगदी पाळले आहे...

प्रोग्रॅम माझा प्रगत, करे वेळेची बचत,
बचत करण्यात ही, सारे आयुष्य खर्चिले आहे...

सगळेच कसे सोपे केले, बटण दाबताच कामे होती,
बटण दाबण्यासही कष्ट व्हावे, मनुष्य इतका आळशी आहे...

सोशल साईट्सच्या माध्यमातून, जगास मी जवळ आणतो,
पण स्वतःच्या नातेबंधांचा, विसर मज आज पडला आहे...

मोठ्या कंपनीत उच्च पदावर, लठ्ठ पगार कमावितो मी,
पैसा खर्च करण्यासाठी, बाजार सुखांचा शोधतो आहे...

आपला,
(काव्यवेअर इंजिनिअर) सौरभ

Orkut logo

1 प्रतिक्रिया

Orkut logo on 17th October 2009 on occasion of Diwali :)

आपला,
(चिर्कुट) सौरभ

ट्विटर...

0 प्रतिक्रिया
आज मी ट्विटर ह्या संकेतस्थळावर नावनोंदणी केली.
तुम्हाला जर मी केलेला चिवचिवाट ऐकायचा असेल तर खालील दुव्यावर भेट द्या.
तुम्हीदेखिल ह्या संकेतस्थळावर नोंदणी करुन सभासद व्हा. म्हणजे आपल्याला एकच थवा करुन सामुहिक चिवचिवाट करता येईल आणि सहजपणे एकमेकांच्या संपर्कात राहता येईल.

आपला,
(चिमण्या) सौरभ

विशुभाऊ आणि माझ्यात झालेला वार्तालाप...

1 प्रतिक्रिया
Vishal: नमस्कार,
तुम्हांला व तुमच्या सर्व कुटुंबीयांना विशुभाऊ रणदिवे व परिवारातर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
ही दीपावली तुम्हाला सुख-समाधानाची, आरोग्याची, ऐश्वर्याची ठरो व तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होवोत, अशी श्री स्वामीचरणी प्रार्थना.
saurabh: (गळाभेट) आपणासही दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा
Vishal: धन्यवाद


saurabh: या... विशुभाऊ... या... फराळ करुयात...
Vishal: नक्कीच
घ्या हे लाडू आणि करंज्या घ्या

saurabh: (दोनदा टाळ्या मारुन...) कोण आहे रे तेथे??? फराळांचे तबक आणा...
धन्यवाद विशुभाऊ...

Vishal: (स्मित हस्य करत) काही गरज नाही... आपल्या आग्रहातच सगळ मिळाल
(एक भुवई ताणून) कधी येणार ह्या भारत देशी परत?

saurabh: हे घ्या... आमच्या मातोश्रींनी खास भारताहून हा फराळ पाठवला आहे... साजूक तुपातला
हि चकली... किती खुसखुशीत आहे...

Vishal: (चाखत) खरच फार अप्रतीम आहे
saurabh: मातृभूमीची आस खुप लागून आहे... पण सध्या आम्ही महत्वाच्या स्वारीवर आहोत...
Vishal: (ताट पुढे करत) हा रव्याचा लाडू बघा चाखुन... तुमच्या वहिनींनी केला आहे
स्वामी आपणास यश देतीलच... तरी आमच्या शुभेच्छा

saurabh: (खुशीत...) वाहवा... लोण्यासारखा विरघळला... अतिशय चविष्ट आहे... (एक संपवून आता दुसरा...)

Vishal: घ्या हो सगळे तुमचेच आहेत

saurabh: स्वामी यश नक्कीच देतील ह्यात शंका नाही. ते लवकर पदरी पडो हिच अपेक्षा..
विशुभाऊ... आपला कारभार कसा चाल्ला आहे?

Vishal: धंदा मंद आहे... पण नोकरी ठिक आहे

saurabh: ह्म्म्... संसार व्यवस्थित आहे ह्याहून अधिक ते काय हवे...
आपल्या उद्योगधंद्यात मनाजोगती प्रगती होवो...

Vishal: धन्यवाद

आपला,
(वार्तालापि) सौरभ

Google logo

2 प्रतिक्रिया
Google logo on 2nd October 2009 :)

आपला,
(गुगल्या) सौरभ

दुःख

1 प्रतिक्रिया

(मी सन्नीपाजीचा 'घायल' चित्रपट बघत होतो. का? कारण सर्व नविन चित्रपटांचे पर्याय संपले होते. सुजय मॉटेलला कामावर जाण्याच्या तयारीत होता. निघण्याआधी त्याने एक सिगरेट सुलगावली. आणि माझ्या खोलीच्या दरवाज्याच्या चौकटीला येऊन खेटून उभा राहीला. मी 'प्यार तो तुम मुझसे करती हो... डोन्ट से नो...' म्हणणाऱ्या सन्नीपाजीकडून पोरगी पटवायचे धडे घेण्यात गर्क होतो. तेवढ्यात...)

सुजय: (सिगरेटचे झुरके सोडत...) ये मिनाक्षी शेषाद्रीभी सही अक्ट्रेस थी

मी: हम्म्म... (पॉझ) अब तो एकदम गायब हो गयी है

सुजय: ऐसेकैसे रे...!??? जानेसे पहले तेरेको कुछ बोलके नही गयी???!!

मी: (उसासा टाकत...) नही रे... देखना साला शादी होनेके बाद कोई कॉन्टॅक्टमें रेहताही नही अश्विनी भावे देख, माधुरीको देख किसीने कॉन्टॅक्ट नही किया लेटेस्ट ऐश्वर्याको देख बच्चन क्या मिल गया, भूलही गयी

(ह्या एकंदर संभाषणादरम्यान आम्हा दोघांच्या चेहऱ्यावर कमालीचं दुःख होतं. हताश नजरेने एकमेकांकडे बघितल्यावर...)

ख्यॅं..ख्यॅं.. (फुल्या फुल्या).. ख्यॅं..ख्यॅं.. (फुल्या फुल्या)..
(ह्यावेळी आम्ही 'ख'च्या बाराखडीत हसत होतो. चल निकलता हू म्हणून सुजय निघाला आणि मी देसी अर्नॉल्डच्या मूव्हीत डोकं खुपसलं.)

आपला,
(दुःखी) सौरभ

आणि भात पकला...

6 प्रतिक्रिया
(भांड्यातील शिजलेला भात पाहून मी सुजयच्या खोलीकडे गेलो...)

मी: साला वनफोर्थ राईस लगाया था, पकके अभी पुरा बर्तन भर गया है|

(आपल्याच तंद्रीत असलेल्या सुजयला अचानक मी असं काही बडबडत आल्याने काही झेपलं नसावं)

सुजय: (???) पकके भर गया मतलब???

मी: मतलब मैने राईसको पकाया| PJ सुनाया| वो पक गया|

सुजय: च्यायला **साला... हाहाहा!!!

(बाजूच्या सोफ्यावर अमित नेहमीसारखा हेडफोन लावून त्याच्या लॅपटॉपमधे घुसून बसलेला. आमच्यातलं बोलणं ऐकून त्याच्या भुवया उंचावल्या. त्यांना दोनदा उडवत, काय झालं? म्हणून विचारलं...)

मी: काही नाही रे... मी सुज्याला बोल्लो की वनफोर्थ राईस पकके बर्तन भरा. त्याने विचारलं पक गया मतलब? मी म्हटलं मी झाकण उघडून राईसला जोक सांगितला. राईस पकला आणि भांड भरलं. आणखी ऐकवलं असतं तर भांड्याबाहेर आला असता वैतागून. नको... नको... मी पकलो... मी शिजतो...

अमित: (डोक धरून) अरेSSS... काय वाईट्ट होतं हे...

(एक लंSSSबी खमोशी... आणि मग आमचं 'ह'च्या बाराखडीतलं हसणंखिदळणं...)

आपला,
(पकाऊ) सौरभ

विचित्र स्वप्न

8 प्रतिक्रिया
१७ जुलैच्या रात्री (...तसा १८ जुलै चालु झालेला तेव्हा...) एक निशाचर प्राणी (...मी...) कधी नव्हे ते रात्री झोपायला गेला. (...हे काम मी शक्यतो तांबडं फुटल्यावर किंवा लोकांचे मॉर्निंग आलार्म वाजून वाजून बंद पडल्यावर करतो... कधी कधी झोपायला जाण्याआधी सकाळचा नाष्टा उरकून मगच जातो... उगीच उपाशी पोटी कशाला झोपायचं...) असो... तर वेळापत्रकात अचानक आलेल्या बदलामुळे मी रात्री लवकर झोपलो. आणि असं अवेळी झोपल्याचा परिणाम म्हणून कि काय मला एक विचित्र स्वप्न पडलं. तर झालं काय की...

सुरुवात... गणपती बाप्पा मोरया...

18 प्रतिक्रिया
(...सौरभवाडीत सौरभच्या कट्ट्यावर माझं भाषण... भाषण ऐकायला अख्खा गाव जमलाय... वेळ ०३.४८am...)

माझ्या (अ)रसिक मित्रांनो आणि मैत्रिणींनो... २३ एप्रिल २००६ हा दिवस ब्लॉगस्पॉट.कॉम च्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहला जाईल असा आहे. ह्या दिवशी ब्लॉगस्पॉट.कॉम वर अनेक ब्लॉग नोंदवले गेले असतील, पण भरीस भर म्हणून ह्या भाराभर ब्लॉगमधे माझ्या ह्या ब्लॉगची भर पडली. आणि तेव्हापासून सलग ३ वर्षांहून जास्त हा ब्लॉग सातत्याने निष्क्रिय आहे. आणि त्याचं सारं श्रेय जातं ते ह्या ब्लॉगच्या निर्मात्याला, अर्थात मला. (...टाळ्यांचा कडकडाट...) तर गेली ३ वर्षांहून जास्त निपचित पडून असलेल्या ब्लॉगची शांतता आज मी भंग करणार आहे. (...श्रोत्यांमधे कुजबुज...) आज ह्या ब्लॉगवर मी काहीतरी खरवडणार आहे. ती खरवड/खरखोड/खाडाखोड काय असेल हे मला अजुन माहित नाही. पण सद्ध्याच्या घडामोडींबाबत गंभीर चर्चा (...हे ऐकून सारे श्रोते ख्यॅं ख्यॅं ख्यॅं करुन विकृत हसतात...) मनातले विचार (...शक्यतो चांगले, चार लोकांत सांगता येतील ते...), अगदीच काही नाही तर, काही ना काही विषय काढून ह्या चव्हाट्यावर मांडण्याचा प्रणय मी केला आहे. (...मी प्रणय केला आहे हे ऐकून सभागृहात एकच हास्यकल्लोळ... बावळट कुठला, म्हणून लोकांच्या प्रतिक्रिया... झालेली चुक लक्षात येताच लगेच सावरुन...) माफ करा निश्चय केला आहे. (...कापूरवडी सारखा ह्याचा निश्चय कधी उडून जाईल समजणारपण नाही... मधेच एक खवट बाई पचकली...)

तर आज १६ जुलै २००९ रोजी ह्या निश्चयाचा श्रीगणेशा म्हणून मी ह्या ब्लॉगमधे काही तरी लिहायचा प्रयत्न करणार आहे. माझं डोकं सुपिक नसल्याने ह्यात तुम्हाला कसदारपणाचा अभाव जाणवेल. पण जे आहे ते गोड मानून घ्या.
म्हणायला हा ह्या ब्लॉगचा दुसरा पोस्ट असला तरी पहिल्यांदाच मी स्वतःचं असं काहीतरी खरवडतो आहे. तर आता तुम्ही विचाराल की अचानक ३ वर्षांनंतर मला काय हुक्की आली की मी हा ब्लॉग लिहायला घेतलाय. विचारा... विचारा की... (...का लिहायला घेतलाय??? सर्व श्रोत्यांनी सामूहिकपणे प्रश्न विचारला...)

हम्म्म्म... खरं सांगायचं तर मला ब्लॉग लिहीत बसण्याची अजिबात हौस नाही. हे खुप कष्टाचं काम आहे. आणि लिहण्यासाठी बराच विचार करावा लागतो, जो मी अजिबात करु शकत नाही. (...हे अगदी खरं आहे... आलेल्या पाहुण्यांपैकी एकजण लगेच माझ्याशी सहमत झाला...) पण तरी आज लिहीतो आहे. (...बऱ्याच श्रोत्यांच्या कपाळावर आठ्या... काहींनी त्या आठ्या झाकायला कपाळावर हात मारुन घेतला...) ह्या लिखाणाचं कारण म्हणजे मेघ. (...श्रोत्यांच्या चेहऱ्यांनी प्रश्नचिन्हाचा आकार घेतल्याने काहीसे वेडेवाकडे झाले...) मेघ म्हणजे आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या. तिला वाटत कि मी चांगलं लिहीतो. (...हे ऐकून एका वृद्धाच्या छातीत कळ आली...) म्हणून तिने हट्ट केलाय आणि मला ४ तासांची मुदत दिली आहे. (...लोकांमधे प्रचंड नाराजी...) आणि आता ०३.३०-०४.०० am वाजता मी काय लिहू त्याचा विचार करतोय. तर ब्लॉगचा श्रीगणेशा म्हणून हा पहिला स्वलिखित पोस्ट मेघच्या नावे. (...टाळया...) मी जरा तिची ओळख करुन देतो. मेघचं नाव मेघ नसून केतकी आहे. पण तिला मी मेघ म्हणूनच बोलावतो. मेघ माझी एकदम खास जुनी मैत्रिण आहे. सद्ध्या भारत फोर्ज ह्या कंपनीमधे कॉर्पोरेट एक्झिक्युटिव म्हणून कार्यरत आहे. ती एक खुप गुणी लेखिका आहे. खुप सुरेख कविता करते. एकाच वेळी दोन भिन्न आणि एकमेकांच्या अगदी विरुद्ध व्यक्तिमत्व तुम्हाला तिच्यात पहायला मिळतिल. sounds complecated... जाऊदे... जास्त विचार करु नका. तिला भेटलात की समजेल. तर आज तिच्या आग्रहा आणि प्रेरणेमूळे मी हा लेख लिहण्याचे धाडस करीत आहे. (...सभागृहात शांतता... एक कार्यकर्ता श्रोत्यांना हातवारे करुन टाळ्या पिटण्याचे ईशारे करतो... टाळ्या पडतात...) धन्यवाद... धन्यवाद...

हम्म्म... तर आता पुढे काय... (...श्रोत्यांचे चेहरे पुन्हा प्रश्नचिन्हासारखे वाकडे...) अरे... म्हणजे हा प्रश्न नाही. पुढे काय म्हणजे आता पुढे काय लिहायचं ह्याचा विचार मी करतो आहे. (...बराच विचार करुनही काही न सुचल्याने सभागृहात शांतता... अचानक कार्यकर्त्याचा फोन वाजतो... दबलेल्या आवाजात काहीतरी बोल्ल्यावर तो माझ्याजवळ येऊन माझ्या कानात सांगतो... साहेब पिक्चर पुर्ण बफर झालाय... पब्लिकला भूक लागलेली दिसत्ये... तुमचे विचार आपण नंतर कधीतरी ऐकवू त्यांना... आता समारंभ आटोपता घ्या... पब्लिकला चहापाणी करुन जाऊद्या... आता ७.०५ होत आले... आपणपण कॉफी घेऊ थोडीथोडी... पुन्हा फ्रेश डोक्याने लिहता येईल... काय???...) हम्म्म... ठिक आहे...

तर मित्रहो... पुढे काय म्हणून विचार करत बसायची ही वेळ नाही. आता आपण कामाला लागलं पाहिजे. जाण्यापुर्वी आपल्या प्रमुख अतिथि मेघबाईंचा नारळ, सुर्यफूल (...अर्र्र्र्र्र्र्र्र्र्...) माफ करा फूलगुच्छ देऊन सन्मान करतो. त्यांचं मार्गदर्शन सतत लाभेल अशी आशा व्यक्त करतो. तुम्ही आज मोठ्या संख्येने इकडे गर्दी करुन आलात... आम्ही भरुन पावलो. तुमचे आशिर्वाद असेच असू द्या. सौरभच्या ह्या कट्ट्यावर (...चव्हाट्यावर म्हणा हवं तर...) रोजच्या दिवसासारखे नवीन ताजे, सिंहगडावर मिळणाऱ्या कांदाभजीसारखे खुसखुशीत मुद्दे येतच राहतील. तुम्ही सर्वांनी त्या चर्चेत आवर्जून भाग घ्यावा ही विनंती करतो. आणि तुमची रजा घेतो...
धन्यवाद...

(...जमाव पांगतो... गर्दी ओसरते...)

आपला,
(वक्ता) सौरभ