गेले कितीतरी तास तसाच झोपून होता तो. अचानक त्याचे डोळे अलगद उघडले. पिवळ्या मंद उजेडात त्याला आई दिसली. तो तिच्याच मांडीवर डोकं ठेऊन झोपला होता. त्याची आई भिंतीशी डोकं टेकवून झोपलेली. झोपताना देखील खूपच दमलेली वाटत होती. रडुन रडुन थकली होती. डोळ्याच्या कडांतुन बाजुला पाहता बाकड्यावर अंगाची गुटमळी करुन झोपलेले बाबा दिसले. तितकेच थकलेले. त्याला तहान लागली होती. घसा कोरडा पडलेला. सलाईन लावलेला हातपण सुन्न झालेला. इस्पितळातल्या छताकडे तसाच एकटक बघत नील निपचित पडुन होता.
---------------------------------------------------
...धाडधाडधाडधाड...धाडधाडधाडधाड...
"सर, धिस इज पीझी. पहाडी ३ जवळ पेट्रोलींग स्क्वाड २वर स्थानिक अतिरेक्यांनी अचानक हल्ला चढवलाय. आम्हाला लवकरात लवकर बॅकअप पाठवा. गोळीबारात आमच्या गाडीची पुर्ण नासधुस झालीये. ऑल युनिट सेफ. वी आर फायटिंग बॅक. बट वी निड अ बॅकअप एएसएपी. ओव्हर." - पीझी
"पेट्रोलींग स्क्वाड २. बॅकअप इज ऑन इट्स वे. होल्ड युअर पोझिशन्स. ओव्हर."
"ऑल युनिट टेक कव्हर. स्टे व्हिजिलन्ट."
...धाडधाडधाडधाड...धाडधाडधाडधाड...
...धाडधाडधाडधाड...धाडधाडधाडधाड...
"सॅवी... सॅवी... सॅवी... आर यु ओके? सॅवी रिस्पॉन्ड. आर यु ओके?" - नील
सॅवीने थम्ब्सअप देऊन अजुन जिवंत असल्याचा इशारा दिला.
"सर, सॅवी इज हिट बॅड्ली. हि इज नॉट एबल टू मुव्ह. आय एम गोईंग तू गेट हिम. गिव्ह मी कव्हर फायर." - नील
"ऑलराईट, डॉम, टिबी कव्हर नील. पीझी, डॅनी वी विल टेक द रेस्ट" - मेजर व्हि
...धाडधाडधाडधाड...धाडधाडधाडधाड...
सरपटत, आडोसा घेत नील सॅवीजवळ पोहचला.
"सॅवी, यु गॉन्ना बी ऑलराईट. स्टे कुल." - नील
सूं सूं सूं सूं... झप्प... एक गरम धातुचा तुकडा नीलच्या मानेला चाटुन गेला.
"ह्म्प्फ्क..."
श्वास रोखुन ठेवलेल्या नीलने सॅवीला खेचुन कसाबसा एका आडोश्याला आणला. डॉम आणि टिबी ताबडतोप त्याच्या मदतीला धावले. तिघांनी मिळुन सॅवीला सुरक्षित ठिकाणी आणलं.
"पीएस२, बॅकअप युनिट ऍट पोझिशन. होस्टाईल टार्गेट हॅज बीन ट्रॅप्ड. हन्ट देम डाऊन."
...धाडधाडधाडधाड...धाडधाडधाडधाड...धडाम...धडाम...धाड...
"पीएस२, ऑल होस्टाईल टार्गेट्स डाऊन. झोन क्लिअर. मुव्ह युअर युनिट टू द बेस."
"शाब्बास, भले शाब्बास. ७ जणांच्या पेट्रोलींग युनिटने जवळपास २० अतिरेक्यांचा हल्ला नुसता फोलच नाही केला तर त्या सर्वांना यमसदनी धाडलं. मला तुमचा अभिमान वाटतो. नील, तुझा गर्व वाटतो. तुझ्यामुळे आज सॅवीचे प्राण नक्कीच वाचतील."
"यॅह्ह... थॅंह्न्क्स..." नीलच्या तोंडुन अस्फुटसे शब्द बाहेर पडले. "ह्म्प्फ्क...ह्म्प्फ्क..."
"नील, तु ठीक आहेस?" मेजर व्हिने जवळ येत विचारलं. "ओह माय गॉड, पीझी इन्फॉर्म बेस टु मेन सिव्हिअरली इंजर्ड."
"सर, वी हॅव टु मेन इंजर्ड. क्रिटिकल कंडिशन. वी निड इमिजिएट मेडिकल सपोर्ट. ओव्हर." - पीझी
"अफर्मेटिव्ह. ओव्हर."
मेजर व्हिने रक्तप्रवाह थांबवण्यासाठी नीलच्या गळ्याभोवती कपडा गुंडाळला. त्याची शुद्ध हरपत चाल्लेली. मगाशी चाटुन गेलेली गोळी मानेच्या खालच्या थोड्या भागाचा लचका उडवुन गेलेली. पण चाललेल्या रणधुमाळीत काही समजलच नाही.
---------------------------------------------------
(हुंदके... उसासे... चिंताग्रस्त चेहरे...)
"डॉक्टर, अजुन किती दिवस ठेवावं लागेल? कधी बरा होईल?" रडत विचारणारी आई.
"काकू, अहो ठिक आहे. काळजीच काही कारण नाही. ऑपरेशन अगदी यशस्वी पार पडलय. ताकद यायला थोडा वेळ तरी जाईलच. काका, सांभाळा ह्यांना..." इंजेक्शन देता देता डॉक्टरने समजूत घातली.
"काही झालं नाहिये त्याला. डॉक्टर आहेत ना. व्यवस्थित होईल लवकरच तो." बाबांचा बिथरलेला पण संयमित आवाज.
"आई..." पलंगावर डोळे मिटुन पडलेला नील थोड्याश्या शुद्धीत होता. "मी ठीक आहे. काळजी नको करुस. उगीच रडु नकोस."
"हो हो. तू तू आराम कर. जास्त बोलू नकोस. पडून रहा."
"बघा काकू, तो बोलला पण तुमच्याशी. लवकरच ठणठणीत होईल. पण त्याला आता आराम करु देत. नील, यु टेक रेस्ट." - डॉक्टर
ग्लानीत असलेला नील लगेचच झोपेच्या आहारी गेला.
---------------------------------------------------
एकटक छताकडे बघत असेला नील भानावर आला. अंग आखडून गेलेलं. तहानेने कासावीस व्हायला होत होतं. पण आपल्या हालचालीने आईची झोपमोड करायची नव्हती. का कोण जाणो त्याला परशुराम आणि कर्णाची गोष्ट आठवली. कर्णाने त्याच्या मांडीवर विसावलेल्या परशुरामांची झोपमोड होऊ नये म्हणुन भुंग्याच्या मांडी पोखरण्याच्या वेदना सहन केलेल्या. इथे मात्र नील जखमी, वेदनेने विव्हळत, तहानेने व्याकुळ आईच्या मांडीवर शांत पडुन होता. तिची झोपमोड होऊ नये म्हणुन.
सैनिकाचं खडतर जीवन जगत होता नील. घरापासुन कित्येक महिने लांब रहा. घरच्यांची काळजी, त्यांच्या आठवणी, त्यामुळे होणारी घालमेल. मोहिमेवर जाताना घर सोडतेवेळी आईबाबांच्या पाया पडताना असं वाटायचं शेवटच पाहतोय. पण तरी हसतमुखाने निरोप घ्यायचा. ह्यामुळेच त्याने स्वतः लग्नाचे कित्येक प्रस्ताव नाकारलेले. अनेक भावनिक वादळं अचानक नीलच्या मनात घोंघावु लागली. पण अश्या भावनांना त्याने कधीच स्वतःचा ताबा घेऊ दिला नाही. सैनिक म्हणुन दुबळा पडला असता तो. आता देखिल त्याला हमसून रडावसं वाटत होतं. पण आईचा चेहरा डोळ्यासमोर आला. जन्मदात्या आईच्या मांडीवर डोकं ठेऊन नील शांत पहुडला होता. त्याची दुसरी आई, त्याची मातृभुमी, त्याच्या मांडीवर निश्चिंत झोपली असल्याचा नीलला उगीचच भास झाला. ह्या दोघींची झोपमोड होऊ नये म्हणुन त्याच्या रुंद छाताडाने लढा देत पुन्हा एकदा सगळी भावनिक वादळं आतच दडपुन टाकली. आसवं गिळत पापण्या मिटल्या. एक हसू ओठावर चिकटवून नील पुन्हा निजता झाला.
आपला,
(लढवय्या) सौरभ