नान-सेन्स - १

1 प्रतिक्रिया


(When things ain't just नान-सेन्स... they are Absolute नान-सेन्स :D)

(नान-सेन्सिबली) Yours,
Saurabh

दिवाळी...

1 प्रतिक्रिया
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी... दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी... Happy Diwali... Happy Diwali...

गुंड्याः अय, बंड्या... काय रे?! कोणत्या दुनियेत राहतोस??

बंड्याः का रे??

गुंड्याः दिवाळी संपली आणि आता शुभेच्छा देतोय्स?!!

बंड्याः अरे हा.. जाऊदे रे. कालच माचाफुकोने दिवाळीचे फोटो एडिट करुन दिले. म्हणुन म्हटलं चला टाकूया ब्लॉगवर. तसंपण बरेच दिवस ब्लॉग सन्नाट्यात होता.

गुंड्याः सन्नाट्यात होता!!!??? आणि आता तु काहीतरी पोस्टुन त्याला सन्नाट्यातुन बाहेर काढतोय्स.

बंड्याः हाऽऽऽ :-)

गुंड्याः बरय. चालू दे.. माझ्यातर्फेपण सगळ्यांना Happy वाली D-वाली.

याऽऽऽय... दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी... दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी...




आपला,
(शुभेच्छुक) सौरभ


Recalling - Her Lacuna

1 प्रतिक्रिया
"कोल्हाट्याचं पोर" वाचून मेघचा Her Lacuna ब्लॉगपोस्ट आठवला... आणि त्यावर केलेली एक कविता...

गावतल्या एका बदनाम गल्लीत, नार उभी करुनी नखरा हो,
वाट पहातसे कोणाची, देहाचा मांडुनि पसारा हो...

भडक तिचे हे रूप असे, जरी ना सुंदर ना मादक हो,
तरी लक्ष घेती वेधुनि, पुरुष पाहती विस्फारुन हो...

लज्जा इच्छा स्वप्न अपेक्षा, मृत झाल्या सर्व संवेदना हो,
जाणिवा करुनि बधीर ती, तृप्त करितसे वासना हो...

शरीरपिपासु जनावरांची, नजर शोधतसे सदा शिकार हो,
नसती का जर ती, तर काय उडाला असता हाहाकार हो...

बलात्कारापासून वाचवतसे, सुसंस्कृत घरचि ललना हो,
विकुनी सत्व तिने स्वत:चे, अब्रु दुसरिची रक्षिली हो...

लाथाडून समाजातून जगाने, तिजवर जरी टाकला बहिष्कार हो,
ओसाड पडतील गावे, परि कधी रिक्त न तिचा बाजार हो...

शमवूनी भोग अनेक जिवांचे, वैरागी ती राहीली हो,
धिक्कारणाऱ्या समाजानेच तिला, शैय्यासोबत केली हो...

भंगलेल्या ह्या अस्तित्वाची तमा कधी ना कुणा हो,
अश्वत्थाम्याच्या जखमेपरि, कधी ना भरेल HER LACUNA हो...

आपला,
(चांगल्या घरचं पोर) सौरभ

पाऊस

0 प्रतिक्रिया

(जुने ठेवणीतले काही...)
ग्रीष्माच्या काहिलीने अवघी सृष्टी होरपळली,
फुंकत प्राण त्यांमधे शितल हवा हळूच झुळकली,
वाहती इकडे तिकडे वारे गार कोणाचे बरे दूत बनून,
काळे मेघ पडघम बडवित नभी अचानक आले दाटून,
दवंडी पिटलि अस्मनि ह्या वीज जेव्हा ती कडाडली,
अगणित सरींची सेना निमिषार्धात ह्या धरतीवर अवतरली,
रिपरिप, रिमझिम, धो-धो करीत पाऊस असा हा बरसला,
कोंदटलेल्या श्वासा-श्वासात मृदगंध सुवासिक दरवळला...

आपला,
(भिजलेला) सौरभ

एका रुपयाची गोष्ट

2 प्रतिक्रिया
गुंड्याः बंड्या तु चहा घेणार का?

बंड्याः चालल..

गुंड्याः अण्णा दोन कटींग दे...
...
...

काय रे?? कसला विचार करतोय्स??

बंड्या: विश्वा करतो चिंताची...

गुंड्या: क्काय???

बंड्या: अरे काय नायरे... चिंता करतो विश्वाची असं म्हणायचं होतं.. सोड ना...

गुंड्या: सकाळी सकाळी मनाचे श्लोक ऐकलेस की ऐकवलेत कोणी?? बोल की...

बंड्या: तसं नाय रे.. उगीच... एक गोष्ट आठवली... कुठंतरी वाचली होती.

गुंड्या: कसली?

बंड्या: एक रुपयाची...

गुंड्या: एक रुपयाची!!! मलापण सांग ना... हां पण एक मिनिट... शॉर्टमधे सांग. चहाच्या दोन घोटात संपव. उगीच डोक्याची तंदूर नको करुस..

बंड्या: च्यायला... हलकट साल्या.. बरं ऐक. एक ना खुप श्रीमंत माणूस असतो. त्याला एक मुलगा असतो. वाया गेलेला, आळशी, कामचुकार. पैश्याची काही किंमत नसते त्याला. मित्रांमधे उडव, मजा मार, कुठे ना कुठेतरी उधळपट्टी चालूच असते. सेविंगचा कन्सेप्टच माहित नसतो त्याला. त्यामुळे त्याचा बाप एकदम टेन्शनमधे असतो. कसं होणार ह्याचं, कधी कळणार पैश्याचं महत्व ह्याला... ते त्याला समजावून समजावून थकले पण बेटा काय सुधरेना.. मग त्याला एक नामी युक्ती सुचते. तो त्याच्या पोराला म्हणतो बेटा... मी आता तुला फक्त तुझ्या गरजेसाठी आवश्यक असतिल तेवढेच पैसे देणार. बाकी तुझ्या खर्चाचे तु स्वतः कमवायचेस. आणि हो... उद्यापासून तु रोज संध्याकाळी जेवणापुर्वी एक काम करायचस. जे काही पैसे तुझ्याकडे असतिल, त्यातला एक रुपया तु माझ्या समोर आपल्या परसातल्या विहीरीत टाकायचास. ज्या दिवशी टाकायला चुकशील त्या दिवशी जेवण नाही मिळणार. बेटा म्हणतो, धत्तिच्या, एकच रुपया टाकायचाय ना. हरकत नाय. उपाशी रहायची वेळ येणारच नाही. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासुन बेटाजीचा उपक्रम चालू झाला. जो काही खर्चाला मिळत असलेल्या थोड्याफार पैश्यातला एक रुपया बाजूला काढायचा आणि जेवणापुर्वी वडिलांच्या उपस्थितीत विहीरीत टाकायला लागला. आगोदरचे काही दिवस असं केल्यावर नंतर त्याला असा एक एक रुपया बाजूला काढून ठेवायचा कंटाळा यायला लागला आणि त्याने ते थांबवलं. हा दिवसभर बाहेर हुंदडायचा आणि संध्याकाळी परत यायचा तेव्हा खिसा रिकामा. पण रुपया टाकल्याशिवाय बाप जेवायला देणार नाही हे माहित असल्याने मग आईकडून एक रुपया मागून घ्यायचा आणि विहीरीत टाकायचा. काही दिवस त्याची आईपण त्याला काही बोलली नाही. पण रोजचंच झाल्यावर तिने त्याला रुपया देणं थांबवलं. ह्याला त्याचं काही वाटलं नाही. पठ्ठ्या मित्रांकडून रोज एक रुपया घेऊ लागला. मित्र सुरुवातीला हसून रुपया द्यायचे. पण नंतर नंतर तेपण वैतागले. एकतर त्याला मिळणारे पैसे कमी, त्यामुळे त्याच्याकडुन होणार खर्च कमी, वर रोज एक रुपया द्या.. मित्र त्याले टाळू लागले. अन् एके दिव्शी त्यो दिस आलाच.. त्याकडं विहीरीत टाकायला रुपडाच न्हव्हता. झालं... बापानं म्हटल्याप्रमानं ठेवलं त्याले उपाशी. पोरगंबी झोपलं गुमान उपाशीपोटी. दुसऱ्या दिव्शीबी त्येच. तिसऱ्या दिवशी पोरगं आलं रडकुंडीला. पर बाप काय भीक घालंना. पोरगं पडलं तणतणत घराबाहेर. फुकटात कोनी रुपया देईना तेव्हा मजुरी करुन एक रुपाया कमावला आणि संध्याकाळी आणला बापासमोर. गेले दोगं विहीरीपाशी. बाप बोल्ला टाक ते नाणं विहीरीत... पोरानं ते नाणं मुठीत अजुनच आवळलं आणि वरडला... न्हाय टाकनार... मेहनत करुन कमावलाय मी त्यो. असाच कसा टाकू. तसा बाप बोल्ला. बेट्टाजी आज तुला मेहनतीनं कमावलेला एक रुपया सोडवेना आणि माझे मेहनतीचे पैसे रोज उधळायचास तेव्हा काय वाटलं नाय. रोज जे नाण टाकायचास तेबी तुझ्या मेहनतीचं न्हवतं म्हणुन टाकायला कायबी वाटत नव्हतं. पन आजचा तुझ्या हाततला रुपया तुज्या सच्च्या मेहनतीचा हाये. नको टाकूस. ठेव तुज्याकडं. तुला पैश्याचं महत्व कळावं म्हणुनच मी हे समदं केलं. पोरगं शाणं होतं. काय ते कळून चुकलं. बापाची माफी मागितली आणि पैसा व्यवस्थित सांभाळू लागला.

गुंड्या: अच्छा... ओके... हम्म्म.. पण अचानक का आठवली तुला ही गोष्ट???

बंड्या: अरे, मी आईबरोबर बाजारात जायचो ना. ती घेऊन जायची मला पिशव्या उचलायला आणि बाजारभाव कसा करावा ते कळावं म्हून. लई वैताग याय्चा राव. एक रुपयासाठी घासाघिस करायची. मी तिले बोलायचे कशाला करतेस एका रुपयासाठी तंटा. दे की सोडून. एका रुपड्यात काय ती भाजीवाली महाल बांधणारे की तु श्रिमंत होणारे?? ती चिडायची. तुला काय समजत नाय म्हणुन मलाच गप्प करायची.

गुंड्या: बरं मग???

बंड्या: परवा आफिसात जाताना म्हटलं वेफर्स घेऊ. कायतरी आपलं तोंडात टाकायला असलं की बरं असतं. मी घेतले आपले पाव किलो. ४५ रुप्ये झाले. मी १०च्या ४ नोटा आणि चिल्लर संपवायचे म्हून २ची ३ नाणी असे ४६ रुप्ये दिले. काकांनी वेफर्स दिले बांधून आणि लागले दुसऱ्यांच्या पुड्या बांधायला. मला वाटलं देतिल सुटा एक रुपया परत. मी थोडावेळ थांबून म्हटलं, काका मी पुरे ६ रुप्ये दिलाव. एक रुपाया परत करा. त्यांच्या ध्यानात नव्हतं आलं मी ६ रुप्ये दिलेत ते. त्यांना वाटलं मी सुटे ५च रुप्ये दिलेत. अच्छा असं का म्हून हसले आणि दिला एक रुपाया परत. लई येगळाच लखलखला रं तो रुपाया.

गुंड्या: बरं मग??? पुढे...

बंड्या: फुडे???!!! फुडे काय फुडे??!!! काय तुला किर्तन ऐकवून रायलो की रामायण महाभारतातल्या गोष्टी?? त्या सांगून संपल्यावरपण विचारशील फुडे??? तुला इतकावेळ काय सांगितलं ते काय झेपलं की नाय???

गुंड्या: (कान खाजवत) बंड्या... तु नोकरीला लागल्यापासून जाम बोर झालाय्स. काय बोलतोय्स मला काही समजत नाहीये.

बंड्या: (कपाळावर हात मारुन घेत..) हाय का... म्हन्जे गाढवासमोर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता म्हनाय्ची वेळ आणलिस माज्यावर...

गुंड्या: गप रे.. कसल्या म्हणी ऐकवतोय्स... आणि हे असं गावरान भाषेत का बोलतोय्स???

बंड्या: (नंदीबैलासारखं डोकं डुलवित) काय नाय असंच... गेले दोन दिवस मकरंद अनासपुरेचे चित्रपट बघुन रायलो त्येचाच पारिणाम असावा...

गुंड्या: (वैतागुन) चल निघायचं का??

बंड्या: निघू...

गुंड्या: अण्णा किती झाले...

अण्णा: दोन कटींग... ४ रुपये...

गुंड्या: हे घ्या..

(गुंड्याने अण्णाच्या हातावर ५ रुपये टेकवले आणि परत दिलेला १ रुपया नं घेताच निघाला. तसा...)

बंड्या: अरे, १ रुपया घे की परत...

गुंड्या: !!! अरे.. चल... वेडा का??? हॉटेलात जातोस ना??? टिप दिलिये ती.. चल...

(बाजुने तिन आणि वर एक असे चार पत्रे टाकून हॉटेल होतं ह्याचं नसेल वाटलं त्याहून जास्त गुंड्याच्या वागण्याचं नवल बंड्याला वाटलं. आणि आपण काय बोलत होतो ते गुंड्याला खरंच काहीच समजलं नाही हेपण कळालं.)

बंड्या: लेका... टिप द्यायला तु कधीपासून कमवायला लागला रे???

गुंड्या: बंड्या, साल्या काय पकवतोय्स... चल... रद्दी आपली हक्काची कमाई आहे. कालच विकलीये. २०० रुपये मिळालेत.

अस्सं म्हणुन बंड्यानं त्या रुपयाकडे एकवार नजर टाकली. तो पुन्हा तसाच लख्खकन चमकला. बंड्या हसला... आणि त्याला पाठमोरा होऊन चालायला लागला....

आपला,
(एक रुपयाधिश) सौरभ

-> कान -> मेंदू -> कान ->

एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देणं वाटतं तितकं सोपं नसतं यार... च्यायला हा साला मेंदू नेहमी मधे येतो....

आपला,
(Drilled) सौरभ

विडंबन

0 प्रतिक्रिया
मेघच्या ब्लॉगवर एकदा एक विडंबन केलेलं. आज उगीच आळवतोय...

मूळ गाणं: भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...
हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला
देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

अन् हे ते विडंबन:

तिष्ठणे इथले संपत नाही, मी अजूनी बेरोजगार पडूनी आहे,
दिवस रात्र मी केलेली, ऍप्लिकेशन्स तशीच पेंडिंग आहे...
मी करे अर्ज नोकऱ्यांचा, अन ह्यांतच वेळ जातो वाया,
नाहीच कसला प्रतिसाद, जराशीही उमेद जागवाया...
ह्या रिसेशनच्या नाजूक वेळी, नोकऱ्या गमावून बसती,
हाती घेऊन रिझ्यूमे, दारोदारी कंपन्यांच्या फिरती...
हा झोल नियतीचा सगळा, आयुष्य रखडवूनी गेला,
आर्थिक मंदीच्या दुष्काळात जणू, तेरावा महिना आला...
जाऊनी पलिकडे सगळ्याच्या, मी म्हणे स्वतःला जरा थांब,
कोरड पडली घशास माझ्या, मी इतकी मारली बोंब...
बिगारी कामातील मजूरासम, मी झटलो हो नेटाने,
डोक्यात घालती गोंधळ, विचारांचे अगणित भुंगे...
बधिर इंद्रिये अवघी, हरपुन भान जाणिवांचे,
हे सरता संपत नाही, ग्रहण माझ्या दुर्दैवाचे...
हे सगळे अवेळी होते, फास्यांनी चुकविली खेळी,
मेंदुत राहीली माझ्या, विणलेली कोळ्यांची जाळी...


आपला,
(लय बेक्कार) सौरभ

शेंबड्या नाकाच्या आणि बोबड्या ओठांच्या कविता...

2 प्रतिक्रिया
शाळेत असताना मी काही कविता केलेल्या आणि एका वहीत लिहून ठेवलेल्या. ती वही सापडली. कविता वाचल्या तेव्हा भारी हसायला आलं. उगीच काहिही यमकं जुळवून कविता केल्यात. ह्या कविता पुर्णपणे विस्मृतीत गेलेल्या. वही मिळाली तशी लगेच स्कॅन करुन घेतली. ज्यांच्याबोवती तुटक बॉर्डर आहे त्या इतर कुठेतरी वाचलेल्या, आवडलेल्या म्हणून नोंद करुन ठेवलेल्या होत्या. तरी आयुष्यात जी पहिली कविता केलेली ती ह्यात नाही. पण माझ्या लक्षात आहे. अशी होती ती...

लहान बाळाला असते काय अक्कल
चड्डीचे सुटले असते त्याचे बक्कल
नीट नसते धड त्याची चप्पल
त्याला असते एक गोलगोल टक्कल
टकल्यात काय शिरणार अक्कल
म्हणून तो करतो साऱ्यांची नक्कल

बाकिच्यांची स्कॅन्ड कॉपी खाली देतोच आहे.




आपला,
(हाप चड्डीतला) सौरभ

शेर आया... भागो भागो...

0 प्रतिक्रिया
बंड्या: मियाँ, अर्ज किया है...
गुंड्या: इर्शाद इर्शाद...
बंड्या: (पानाचा तोबरा थुकत) आँ थू थू थू थू...
गुंड्या: वाह वाह!!! वाह वाह!!!
बंड्या: मियाँ शेर यह नही था, वो तो अब फर्माऊँगा|
गुंड्या: ओह्ह अच्छा... इर्शाद इर्शाद...
बंड्या:
साला पिनेवाले होश संभाल ना सके, और शराब बदनाम हो गई|
कंबख़्त आशिक प्यार निभा ना सके, ख़्वामख़ाँ मोहोब्बत एक सजा हो गई|

गुंड्या: ईईईय्य्याक्क्क... च्यामायला ब्येकार येक्दम.. पला पला बालान्नू...

आपला,
(शेरु) सौरभ