लहान वयात केलेले संस्कार जसे चांगले असतात, तसच चुका पण सुरुवातीला सुधरवलेल्या चांगल्या असतात. पर अचानक ये ज्ञान कायको?? बंड्याचा दोस्त बब्या तसं आडदांड नि वांड कार्टा. अन् त्याचा हा किस्सा...
तर बब्याभाईला एकदा अचानक त्याचा लहानपणीचा दोस्त भेटला. भेटला तो भेटला तेपण निवांत क्षणी. मग काय गप्पांना आला ऊत. रात्र झाली तरी हाणतायत गप्पा. कोरड पडलेल्या घशांमुळे मैफिल अर्धी राहू नये म्हणून त्यांना ओलं करण्याचा एक थोर विचार मनी आला आणि बियरच्या बाटल्या घेऊन बसले बसस्टॉपवर... बसस्टॉप... हा की राव, बसस्टॉप, सार्वजनिक ठिकाणी. चांगली बोलबच्चन चालू होती आणि आली तिकडे पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन. साहेब साला चिल की नजरवाला कौव्वा था. पोरांना बाटल्या मागं सारताना पाहिलं. झालं. बोनस मिळणार असे लड्डू सायबाच्या मनात फुटायला लागले. पोरांची झडती घेतली. अगदीच कंगाल निघाली पोरं. वाटलं पोरांना थोडा राग दिला की पोरं हात/पाय/पंख/खिसे/कपडे झटकून थोडेतरी पैसे काढतिल. कसलं काय... कफल्लक साले. सायबाची चिडचिड. घातलं गाडीत. "साहेब, चुक झाली हो... द्या सोडुन... पुन्हा नाय होणार...". बब्या नि त्याच्या दोस्ताची विनवण्यांची थुकपट्टी चालू. साहेब ऐकेना. आणि उलटं सायबानंच भारी डायलॉग टाकला...
पहिले एक चुक होते. मग चुकीचा खिळा होतो. मग खिळ्याचा खिळ होतो. मग खिळचा खुट्टा होतो. मग खुट्ट्याचं पाचर होतं. आणि ते पाचर **त घुसतं. म्हणून चुक होताच मोडली पाहिजे.सायबानं भारी श्लेष पकडला. त्याचा खाऊ नाही मिळाला म्हणून ही पुडी सोडली. (छोट्या खिळ्याला चुक म्हणतात हे मला माहित नव्हतं.) पर ये जो ज्ञान दिया ते लई भारी दिलं राव!!! त्यासाठी सायबाला वरंगुठा.
अवांतर १ - बब्याच्या दोस्ताचा बाप पालिकेत कमिशनर निघाला. मॅटर क्लोज.
अवांतर २ - वरंगुठा = वर + अंगुठा AKA ThumbsUp