सावली

"काय?"

"काय?"

(जरा खेकसूनच) "काय काय ?"

"अरे कुठे काय ? काहीच नाही "

"काहीच नाही? हं? कधीच काही नसतं सांगायला तुझ्याकडे … हा ? मग कशाला उगाच माझा पाठलाग करत असतेस …नेहमी उगीच मागे पुढे घुटमळत राहतेस….

"नेहमी ?"

"हा चुकलंच… नेहमी कुठे? अंधार आला की तू जातेस लगेच सोडून…."

"तेव्हाही असते… पण… दिसत नाही एवढच…"

"काही पण "

"अरे तुझ्याबरोबर असणं नियतीच आहे."

"नियती? आ? कसलं काय… काही नियती-बियती नाही…. बिन कामाची तू… नुसतीच असतेच…. उलट तुझ असणं मला मी अजूनही  जमिनीवरच आहे ह्याची जाणीव करून देत राहतं… "

"मग बरं आहे न जमिनीवर असणं "

"बरं? मला आभाळात उडायचंय… उंच उंच… अगदी त्या प्रकाशासारखं…. आणि असं जमिनीवर राहून माझा प्रकाशाकडचा प्रवास सुरूपण होणार नाही … आणि सुरु झाल्यावरही तू अशी भिरभिरणार माझ्या मागे... माझी सावली… सावली -प्रकाशाचा अभाव…. अंधारच एक प्रकारचा… त्या आभाळातल्या प्रकाशाची सावली पाहिलीयेस कधी? नसतेच त्याला सावली….  नसतोच त्याला अंधाराचा एकही धागा…"

"..."

"काय झालं? गप्प का?"

"मग जाऊ सोडून?"

"जा ना… मघापासून काय सांगतोय मग… निरुपोयोगी तू… कोणी थांबवलंय तुला…." 

"उम्म…  बरं… जाते मी……"

सावलीने साथ सोडली तसा तो मोकळा झाला… लागलीच त्याने  प्रवास सुरु केला… प्रकाशाच्या दिशेने… जमिनीवरून  हळू हळू अधांतरी होत… तरंगत वर वर… उंच… अवकाशाकडे...

आणि तिथे एक वृक्ष. आत्यंतिक तेजाने झळझळणारा… बोधी वृक्ष… पाहता क्षणीच त्याची अंतरीची खुण पटली… ह्याच वृक्षाखाली बुद्धाला आंतर्ज्ञान प्राप्त झालेलं. हाच तो प्रकाश वृक्ष. माझ्या प्रवासचं ध्येय. केवढा दैदिप्यमान फुलोरा. जणू काही कोणी सूर्याला कापसाच्या बोळ्यासारखं पिळल्यावर ठिबकलेला प्रकाशाचा थेंब त्या वृक्षाने अलगद वरचेवर झेलून घेतलेला. 
आपल्या अंतिम ध्येयापर्यंत पोहचल्याची, प्रवास पूर्ण झाल्याची जाणीव त्याच्या मनात. सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण... पण...

पण त्याला थकल्यासारख वाटतंय... फारच कासावीस झालाय... आनंद साजरा करता येत नाहीये... थकवा आलाय. एवढं तेज... एवढं प्रचंड तेज सहन करायची ताकद नाहीये. चोहीकडे भरलेला हा प्रकाश डोळ्यात साठवता येत नाहीये. भोवळ येईल असं जाणवतंय. विसावायला कुठे बोटंभरपण सावली दिसत नाहीये.

सावली....... सावली....... निरर्थक तू...... निरुपयोगी तू..... निरर्थक तू.... निरुपयोगी तू.... आह!... तेच शब्द कानात घोंघावतायेत... 

आणि हा प्रकाश असह्य होत चाललेला

अं... शुद्ध हरपतेय

सभोवती रणरणतं ऊन. सळसळनाऱ्या पिंपळाच्या सावलीत विसावलेला तो. एका थंड हवेच्या झुळूकेने सर्व शीण कापसासारखा उडून गेला.    

त्याचा प्रकाशाकडचा प्रवास असा एका सावलीशी संपलेला होता... आणि नुकताच जन्मलेला बुद्ध हळूच गालातल्या गालात हसत होता...